अहमदनगर : गेल्या महिनाभरात ब्रिटनधून नगर जिल्ह्यात आलेल्या आणखी १३ जणांची यादी जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाली असून, ब्रिटनमधून आलेल्यांची संख्या आता २६ वर पाेहोचली आहे. त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली असून, ग्रामीण भागातील चार जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
ब्रिटनमध्ये कोराना विषाणूमध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. २७ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची यादी विमानतळ आरोग्य विभागाकडून राज्य सरकारला प्राप्त झाली आहे. राज्य सरकारकडून शुक्रवारी आणखी १३ जणांची यादी जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे ब्रिटनधून नगर जिल्ह्यात आलेल्यांची संख्या २६ झाली आहे. यापैकी सहा जण हे ग्रामीण भागातील असून, उर्वरित १६ नगर शहरातील आहेत. ब्रिटनमधून आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली. ब्रिटनमधून महिनाभरात हे प्रवासी जिल्ह्यात आले आहेत. एक जण पुणे व मुंबईत असल्याचे सांगण्यात आले.
...