कोपरगाव : निळवंडे धरणातून शिर्डी-कोपरगाव या २६० कोटी ३९ लाख रुपये खर्चाच्या संयुक्त वाढीव पाणीपुरवठा योजनेस राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय जटिल होत चालला आहे. गोदावरी डाव्या कालव्यातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेता हे पाणी कमी पडत असल्याने चार-पाच दिवसांआड नळांना पाणी येते. ही बाब गांभीर्याने लक्षात घेत कोल्हे यांनी शहरासाठी निळवंडे धरणातून पाईपलाईनव्दारे पाणी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. दरम्यान निळवंडे ते शिर्डी पाईपलाईन पुढे कोपरगाव शहरासाठी नेण्याचा नवीन प्रस्ताव कोल्हे यांनी सादर केला. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणी पुरवठा विभागामार्फत त्यांचा पाठपुरावा सुरू होता. या योजनेस २५ जानेवारीला तांत्रिक मान्यता घेऊन तो दोन टप्प्यात राबविण्यास मान्यता देण्याची विनंती साई संस्थानतर्फे करण्यात आली. दरम्यान ७ फेब्रुवारीस विधी व न्याय विभागाने वाढीव शिर्डी व कोपरगाव नगरपालिका संयुक्त पाणीपुरवठा योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे कोपरगावकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघून दररोज शुुध्द पाणी मिळणार आहे. ३ वर्र्षात ही योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे गोदावरी कालव्याचे एक आवर्तन वाढणार आहे. धरणातून पाणी उचलण्यासाठी सरकारला भरावे लागणारे पैसे मुख्यमंत्र्यांनी माफ केल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेमुळे सिंचन कमी होईल, अशी ओरड करून विरोधकांनी शेतकºयांना भडकविले. माझ्या विरोधात टिकाटिप्पणी केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये अपप्रचार केला. पण आपण कुणाच्या हक्काचे पाणी हिरावून घेणार नाही, याची जाण विरोधकांनी ठेवावी. मी शहर विकास डोळ्यासमोर ठेवून काम करते. कुठल्याही विषयात राजकारण होऊ नये. योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कोपरगावकरांनी ज्यांच्याकडे पालकत्व दिले आहे, त्यांना विचारणा केली पाहिजे.-स्नेहलता कोल्हे, आमदार, कोपरगाव.