अहमदनगर : नगर शहरातील प्रभाग चारमधील नगर-मनमाड रोड ते साईदीप हॉस्पिटल दरम्यान असणाऱ्या चांगल्या स्थितीतील रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी स्थायी समितीने २७ मार्च २०२३ रोजी २७ लाख रुपये खर्चाच्या निविदेला मंजुरी दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या रस्त्यावर सोमवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी क्रिकेट खेळून रस्ता सुस्थितीत असल्याचे फोटो, व्हिडिओ समाज माध्यमांवरून व्हायरल केले आहेत. हा नगरसेवक, अधिकारी व ठेकेदाराने संगनमताने केलेला भ्रष्टाचार असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला.
काँग्रसेच्या रस्त्यावर रंगलेल्या क्रिकेटमध्ये काळे यांच्यासह अनिस चुडीवाला, माजी नगरसेवक संजय झिंजे, विलास उबाळे, माजी नगरसेविका जरीना पठाण, पूनम वंनंम, दशरथ शिंदे, रतिलाल भंडारी, अलतमश जरीवाला, सुनील भिंगारदिवे, सुजित क्षेत्रे, गणेश आपरे, आकाश आल्हाट, प्रणव मकासरे, आनंद जवंजाळ, गौरव घोरपडे, प्रशांत जाधव, अजय मिसाळ, बिभीषण चव्हाण, समीर शेख, सुरज घोडके, राकेश पवार, अक्षय साळवे आदी सहभागी झाले होते. यावेळी काळे म्हणाले स्थायी समितीच्या २७ मार्चच्या बैठकीत हॉस्पिटल समोरील रस्त्याची मे. बेस्ट कन्स्ट्रक्शनची सुमारे २७ लाखांची मजबुतीकरण व डांबरीकरणाची निविदा क्र. ८५४२९५-१ मंजूर केली आहे.
रस्ता सुस्थितीत असतानाही लिपिक, उपअभियंता, शहर अभियंता यांनी काही नगरसेवकांच्या व लोकप्रतिनिधींच्या सूचनेवरून हा रस्ता खराब असून करण्याची आवश्यकता असल्याचा बनावट अहवाल तयार केला. त्यावर मुख्य लेखाअधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, उपायुक्त (सा) आदींनी सहमतीदर्शक स्वाक्षरी करुन हा विषय मंजूरीसाठी ठेवला. काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी संगनमताने केलेला हा भ्रष्टाचार असून या विरोधात तीव्र आंदोलनाचा ईशारा यावेळी काळे यांनी दिला.