कोपरगाव : नगर परिषदेतील सर्वसाधारण सभेत शहरातील २८ रस्त्यांची कामे आम्ही नामंजूर केली, कारण या सर्व कामांची अंदाजपत्रके ही अवाच्या सव्वा रकमेची होती. काही अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांची कामे होती. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांतून मोठा भ्रष्टाचार होण्याची चिन्हे दिसत असल्याने ही कामे नामंजूर केली. मात्र, आमचा या रस्त्याच्या कामांना विरोध नाही; परंतु या सर्वच कामांचे सुधारित अंदाजपत्रक काढून मंजुरीला ठेवा, आम्ही तात्काळ मंजूर करू, असा खुलासा भाजपा - शिवसेनेच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केला आहे. भाजपाच्या संपर्क कार्यालयात भाजपा व शिवेसना नगरसेवकांनी बुधवारी ( दि.१७) पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली.
उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे म्हणाले, मंगळवारच्या सभेत विषय क्रमांक एक नामंजूर करताना १५ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या ऑनलाइन सभेत तांत्रिक अडचणीमुळे विषय समजले नाहीत. त्यामुळे सभा सुरू असताना २० नगरसेवकांच्या सह्यांचे पत्र देऊनही नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे या सभेत काय विषय मंजूर झाले त्याला आम्ही विरोध दर्शविला. २८ रस्त्यांची कामे मंजुरीसाठी ठेवली, ती सर्व अवाच्या सव्वा रकमेची आहेत. अण्णाभाऊ साठे पुतळा ते येवला नाका या अरुंद रस्त्यावर दुभाजक टाकण्याचे काम करणार आहे. विशेष म्हणजे हा रस्ता सध्या सुस्थितीत आहे. तसेच सुदेश टॉकीज ते एस. जी. विद्यालय या रस्त्याच्या कामाच्या निविदेत रस्त्याच्या डांबरीकरणाइतकीच साइडपट्टी व इतर कामाच्या खर्चाची तरतूद आहे. अशीच परिस्थिती इतर सर्वच रस्त्यांची आहे. सर्व २८ रस्त्यांची एकूण रक्कम ८ कोटी आहे. त्यात फक्त सुपरव्हिजन फी ४० लाख रुपये आहे. त्यामुळे आम्ही कामे नामंजूर केली. २८ कामे स्थायी समितीच्या बैठकीत दोन वेळा नामंजूर केली होती. याचे फेरअंदाजपत्रक काढून कामे मंजुरीला ठेवा. आम्ही मंजुरी देतो, असे सांगितले; परंतु तसे न करता नगराध्यक्षानी वारंवार याच कामांना मंजुरी द्या, अशी भूमिका घेतली.
या सर्व प्रक्रियेत चार महिन्यांचा कालावधी गेला. वास्तविक चार महिन्यांत ही सर्व फेरप्रक्रिया होऊन काही रस्त्यांची कामेही सुरू झाली असती; परंतु नगराध्यक्षांनी तसे केले नाही. तसेच १६ क्रमांकाचा विषय असलेल्या सौरपॅनल बसविण्यासाठी खर्च किती येणार याची आकडेवारी न दिल्याने तो विषय नामंजूर केला. जाणूनबुजून शहरवासीयांमध्ये आमच्याविषयी गैरसमज पसरवून दिशाभूल करण्याचे काम नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे नगरसेवक करीत आहेत. यावेळी पराग संधान, स्वप्नील निखाडे, संजय सातभाई, जनार्दन कदम, कैलास जाधव, शिवाजी खांडेकर, विनोद राक्षे, बबलू वाणी उपस्थित होते.