अहमदनगर : राज्य सरकारने कर्जमाफीस पात्र शेतक-यांची तिसरी यादी प्रसिद्ध केली. मात्र लॉकडाऊनमुळे आधार प्रमाणिकरण बंद आहे. त्यामुळे शेतक-यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर जैसे थे असून, २८ हजार शेतकरी खरीप कर्जास अपात्र ठरले आहे. कोरोनाच्या संकटातून पुन्हा उभारी घेण्यासाठी भांडवल आणायचे कोठून? असा प्रश्न शेतक-यांसमोर आहे. राज्य सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. सरकारने कर्जमाफीस पात्र शेतक-यांच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या. मात्र तिसरी यादी प्रसिध्द करण्यापूर्वीच लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे ही यादी सरकारने थेट बँकांना पाठविली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेला जिल्ह्यातील २६ हजार पात्र शेतक-यांची यादी प्राप्त झाली आहे. मागील दोन याद्यामध्ये नावे असलेल्या दोन हजार शेतक-यांना तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफी मिळालेली नाही. कर्जमाफीस पात्र शेतक-यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतक-यांचे आधार प्रामाणिकरण केले जाते. शेतक-यांनी बायोमेट्रिक मशीनवर अंगठा दिल्यानंतर शेतक-यांच्या कर्ज खात्यात कर्जाची रक्कम जमा होते. ही रक्कम जमा झाल्यानंतर शेतकरी कर्जमुक्त होऊन पुन्हा नवीन कर्ज घेण्यास पात्र होतात. परंतु, सध्या लॉकडाऊन असल्याने सेतू केंद्रांवर गर्दी होईल, या भितीने सरकारने आधार प्रामाणिकरणाचे पोर्टल बंद केले आहे. त्यामुळे तिस-या यादीतील पात्र शेतक-यांचे आधार प्रामाणिकरण रखडले असून, हे शेतकरी नवीन कर्ज घेण्यास अपात्र ठरले आहेत. खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतीची मशागत, खते बी-बियाणे, यासाठी शेतक-यांना वेळेवर कर्ज मिळणे जरुरीचे आहे. परंतु, कर्जमाफीची अंमलबजावणी सध्या बंद आहे. त्यामुळे मागील कर्जाचा डोंगर जैसे थे असल्याने बँका शेतक-यांना दारात उभ्या करत नाहीत. त्यात कोरोनामुळे लॉकडाऊन आहे़ सर्व व्यवहार बंद आहेत. बँका एकमेव पर्याय आहे. पण, कर्जमाफीची प्रक्रिया रखडल्याने बँकाही कर्ज देऊ शकत नसल्याने जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल आहे. सरकारने याबाबत तातडीने निर्णय घेऊन कर्जमाफीचा निर्णय घेण्याची मागणी जिल्ह्यातून पुढे येत आहे.आतापर्यंत ५० टक्केच कर्ज पुरवठाएप्रिलअखेर जिल्हा सहकारी बँकेकडून ५०० कोटीहून अधिक खरीप पीक कर्जाचे वाटप होत असते. यंदा कर्जमाफीमुळे पात्र शेतक-यांची संख्या वाढली. पण, लॉकडाऊन आणि रखडलेल्या कर्जमाफीमुळे आतापर्यंत जिल्हा सहकारी बँकेकडून २५५ कोटींचेच कर्ज वाटप झाले आहे.
२८ हजार शेतकरी खरीप कर्जास अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 2:06 PM