लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : मागील महिन्यात तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. या ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक मंगळवारी व बुधवारी होणार आहे.
यामध्ये मंगळवारी ( दि. ९ ) सवंत्सर, सांगवी भुसार, उक्कडगाव, तिळवणी, घारी, रवंदे, ओगदी, अंचलगाव, सोनारी, हिंगणी, वेळापूर, देर्डे चांदवड, मढी बुद्रुक, मढी खुर्द, आपेगाव, नाटेगाव, कोळगाव थडी, मळेगाव थडी, मनेगाव, जेऊर कुंभारी, धोंडेवाडी, अंजनापूर, कोकमठाण, कासली, टाकळी, जेऊर पाटोदा या २६, तर बुधवारी (दि. १०) काकडी - मल्हारवाडी, येसगाव व मायगाव देवी या तीन अशा एकूण २९ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत सकाळी १० ते ११ सरपंच, उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे, ११ ते १२ दाखल अर्जांची छाननी, १२ ते १ अर्ज माघारी, त्यानंतर २ वाजता सभा होणार आहे. या सभेत सरपंच, उपसरपंच यांच्या निवडी जाहीर करण्यात येणार आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला एक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहे, तर ग्रामसेवक सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
........
या ग्रामपंचायतींत सरपंचपदाचे उमेदवार नाहीत
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या येसगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती स्त्रीसाठी, तर तिळवणी व मढी खुर्द या दोन ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जातीच्या स्त्रीसाठी राखीव झाले आहे. मात्र, या तीनही ग्रामपंचायतीत सरपंच पदाच्या आरक्षणाची एकही महिला सदस्य म्हणून निवडून आलेली नाही. त्यामुळे दोन दिवस होणाऱ्या सरपंच पदाच्या निवडीत या तीनही गावांचा सरपंच निवडला जाणार नाही. त्यामुळे फक्त उपसरपंचाची निवड होऊ शकते.
.........
ज्या ग्रामपंचायतींत सरपंचपदाच्या आरक्षणाचे उमेदवार नाहीत. अशा ग्रामपंचायतींचा या निवडणुकीनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. मार्गदर्शन आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.
- योगेश चंद्रे, तहसीलदार, कोपरगाव.