केडगाव : नगर तालुक्यातील सारोळा कासार सोसायटीच्या २ संचालकांनी कर्जाची परतफेड वेळेत केली नाही म्हणून तर एका संचालकाने कुठल्याही स्वरूपाचे कर्ज घेतलेले नसल्याने प्राप्त झालेल्या तक्रारींवरून या ३ संचालकांचे पद रद्द करण्याची कारवाई नगर तालुका उपनिबंधक आर. बी. कुलकर्णी यांनी केली आहे. यामध्ये शिक्षक नेते संजय आप्पासाहेब धामणे यांच्यासह २ माजी व्हाईस चेअरमनचा समावेश आहे.सोसायटीतील सत्ताधारी रविंद्र कडूस गटाचे संचालक आणिमाजी व्हाईस चेअरमन अरुण भिकाजी जाधव हे संस्थेचे अनेक वर्षापासुनचे सभासद आहेत. मात्र सध्या त्यांच्या नावावर गावात जमीन नाही, तसेच त्यांनी कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नाही आणि ते सध्या गावात रहिवाशी नसल्याने त्यांचे पद रद्द करण्याबाबतची तक्रार विरोधी गटातर्फे करण्यात आली होती. या तक्रारी नंतर अरुण जाधव यांनीही विरोधी गटाचे संचालक शिक्षक नेते संजय धामणे व माजी व्हाईस चेअरमनच अनिता दिगंबर धामणे यांनी सलग दोन वर्षे अल्प व मध्यम मुदत कर्ज वेळेत भरलेले नसून तशी नोंद संस्थेच्या लेखापरीक्षण अहवालात झालेली असल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क अ (१)(एक)(ब) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम ५८ नुसार पदावर राहण्यास अपात्र ठरत असल्याने त्यांचे पद रद्द करण्याची तक्रार केली.या दोन्ही तक्रारी स्विकारत तालुका उपनिबंधक आर.बी.कुलकर्णी यांनी त्यावर रीतसर सुनावण्या घेतल्या. संचालक संजय धामणे व अनिता धामणे यांनी तक्रार ही राजकीय हेतूने केली आहे. तसेच तक्रार दाखल झाल्यावर २ मे रोजी सर्व थकबाकी भरली असल्याचा बचावाचा युक्तिवाद केला. मात्र तक्रारदार अरुण जाधव यांच्या वतीने अॅड. प्रसन्ना जोशी यांनी हा बचाव खोडून काढत या दोघांनी तक्रार दाखल झाल्यावर थकबाकी भरली आहे म्हणजे थकबाकीदार असल्याचे मान्य केले आहे. कलम ७३ क अ मध्ये थकीत रक्कम भरल्यानंतर अपात्रता होत नाही असे कुठेही नमूद नाही. त्यांनी स्पष्टपणे तरतुदींचे उल्लंघन केलेले आहे, संस्थेच्या लेखापरीक्षण अहवालातही त्यांची नावे थकबाकीदार यादीत आहेत. त्यामुळे ते संचालक म्हणून राहण्यास अपात्र आहेत. त्यासोबत अशा प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निकालाचा संदर्भही त्यांनी दिला. त्यांचा हा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून तसेच तक्रारदाराने सादर केलेले पुरावे, संस्थेच्या सचिवांनी मार्च २०१८ अखेर पर्यंत दोघे थकबाकीदार होते, २ मे रोजी थकबाकी भरल्याचा दिलेला अहवाल पाहून उपनिबंधक कुलकर्णी यांनी दोघांचेही संचालक पद रद्द केले आहे. त्यामुळे त्यांना पुढील ६ वर्ष सहकारी संस्थेची कुठलीही निवडणूक लढवता येणार नसल्याचे अॅड. प्रसन्ना जोशी यांनी सांगितले.दुस-या प्रकरणात संचालक अरुण जाधव हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ११ आणि संस्थेच्या नमूद उपविधी ६(३) व ४(१४)(४) अन्वये सभासदत्वासाठी आवश्यक त्या पात्रता धारण करीत नसल्याने त्यांचे नाव संस्थेच्या सभासद नोंदवहीतून १ महिन्याच्या आत कमी करण्याचे आदेश सोसायटीला दिले आहेत. सारोळा कासार सोसायटीच्या इतिहासात असा प्रकारे संचालक पद रद्द होणे आणि तेही एकाच वेळी तिघांचे ही पहिलीच घटना असल्याने गावच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
सारोळा कासार सोसायटीच्या ३ संचालकांचे पद रद्द : शिक्षक नेते संजय धामणे यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 4:57 PM