कोपरगाव : पाच वर्षापेक्षा अधिक काळ लेखा परिक्षण, अहवाल बदल सादर न करणा-या महाराष्ट्रातील सुमारे ३ लाख संस्थांची नोंदणी रद्द होणार असल्याची माहिती पुणे विभागाचे सहायक धर्मदाय आयुक्त शिवाजी कचरे यांनी दिली.कोपरगाव येथील के.जे.सोमैय्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व लायन्स मुकबधीर विद्यालयास कचरे यांनी बुधवारी भेट दिली. ते म्हणाले, पुणे विभागातील अहमदनगर, पुणे, सोलापुर व सातारा या चारही जिल्ह्यांमध्ये २९ हजार निष्क्रीय संस्था आहेत. त्यात नगर जिल्ह्यातील १० हजार संस्थांचा समावेश आहे. सर्व संस्थांचा मुळ अभिलेख तपासण्यात आला आहे. त्यात धर्मदाय कायद्यान्वये नोंदणी झाल्यापासून हिशोब पत्रके व विश्वस्त बदलाचे अर्ज सादर केलेली नाहीत. अशा संस्थांना नोटीसा देण्यात आल्या असुन चारही जिल्ह्यातील २९ हजार २०९ संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. आत्तापर्यंत नगर जिल्ह्यातील १६७ संस्था निष्क्रीय करण्यात आल्याचे कचरे यांनी सांगितले. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे व विश्वस्त अशोक खांबेकर यांनी कचरे यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्राचार्य डॉ.बी.एस.यादव व सदस्य संदीप रोहमारे उपस्थित होते.
पुणे विभागातील निष्क्रीय संस्था
पुणे जिल्हा (१० हजार ५९), नगर जिल्हा (१० हजार ५००), सोलापूर जिल्हा (१ हजार १०६) व सातारा जिल्हा (७ हजार ५४४) अशा एकूण २९ हजार २०९ संस्थांची नोंदणी रद्द होणार.