शिर्डी : अकरा वर्षभरापूर्वी कर्नाटकातील एका तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून साईभक्तांचा ग्रुप बनवला़ जवळपास पंधरा देशातील विविध जाती, धर्माचे एक लाख सदस्य या ग्रुपमध्ये सक्रिय आहेत़ या माध्यमातून एकत्र आलेल्या भाविकांनी शनिवारी साईबाबांना जवळपास सव्वीस लाख रूपयांच्या सोन्या-चांदीच्या वस्तू अर्पण केल्या़अकरा वर्षापूर्वी हेतल यांनी साई युग ब्लॉग बनविला़ या ब्लॉगने जगभरातील सर्व धर्माचे एक लाख भाविक जोडले गेले़ यावर सार्इंबाबांचे अनुभव शेअर करण्यात येत आहेत. साईसमाधी शताब्दीच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापूर्वी यातून श्री शिर्डी साईबाबा सेवा समिती, श्री शिर्डी साईबाबा भजन मंडली या नावाने गिरीश एच़ए़ जनार्धन रेड्डी, लविना रेड्डी, सविता गिरीश, रमेश बासू, सविता शिवान्ना, रूपा रमेश, भार्गवी, भारत व राजन्ना आदींनी ट्रस्ट सुरू केला़ कर्नाटकच्या विविध भागात १०८ ठिकाणी भजनांचे कार्यक्रम घेण्यात आले़ दावनगिरी जवळ झोपडपट्टीत अन्नदान करण्यात आले़ शताब्दीत मागील वर्षी दर गुरूवारी विविध देशातील विविध धर्मांचे, स्टेटसचे, विविध वयांचे भाविक एक एक अध्याय वाचून एक दिवसात पारायण करीत़ याद्वारे १०८ पारायणे झाली़ यंदाही हा उपक्रम सुरू राहणार आहे़ यापुढे अन्नदान व रूग्णसेवेसाठी काम करण्यात येणार असल्याचे गिरीश यांनी सांगितले़ साई आर्मीची स्थापना करण्यात येत आहे. यातील तरुण गावोगावी असलेल्या साईमंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यासाठी पुढाकार घेतील.जगभर विखुरलेल्या शेकडो भाविकांनी एकत्र येत बाबांना जवळपास सव्वीस लाखांची देणगी दिली़ यात २२ लाख ६५ हजारांच्या सुवर्ण कवच असलेल्या दोन रूद्राक्ष माळा, यातील एकीला सुवर्ण पेंडल तसेच ३ लाख २५ हजारांच्या दोन मोठ्या चांदीच्या बादल्या, सुंदर नक्षीकाम असलेल्या दोन मोठ्या प्लेट आणि एक हार यांचा समावेश आहे़ संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी संस्थानच्या वतीने या देणगीचा स्वीकार केला़ यावेळी मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, प्रशांत सूर्यवंशी, अतुल कुंभकर्ण आदींची उपस्थिती होती़ दुपारी मध्यान्ह आरतीनंतर या वस्तू या भाविकांच्या प्रतिनिधींच्या हस्ते समाधीवर चढविण्यात आल्या़
जगभरातील सोशल मीडियावरील भक्तांची साईबाबांना २५ लाखांची वस्तूरुपात देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 7:23 PM