शिर्डी : काकडी-शिर्डी विमानतळासाठी ३०० कोटी रुपये उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
काकडी ग्रामपंचायतीच्या थकीत मालमत्ता कराबाबतदेखील लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे पवार यांनी सांगितल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दिली.
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी, तसेच काकडी व पंचक्रोशीतील गावांचा विकास होण्यासाठी आवश्यक असणारी सुधारित विकास कामे व्हावीत यासाठी बैठक घ्यावी. मुंबई येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात सोमवारी बैठक पार पडली.
यावेळी नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, वित्त विभाग सचिव मित्तल, महसूल व वन विभागाचे मिलिंद म्हैसकर, सामान्य प्रशासन विभाग प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष दीपक कपूर उपस्थित होते. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री, सहायक वनसंरक्षक देवखळे यांनी सहभाग घेतला.
उपमुख्यमंत्री पवार यांनी गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाने शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्गो सेवा सुरू करणे, रात्रीची उड्डाणे सुरू करणे, विमानतळावरील पाणी काकडी पाझर तलावात वळविणे, विमानतळाच्या बाजूने सर्विलन्स रोड तयार करणे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. काकडी विमानतळासाठी २०० कोटी रुपये निधीची तरतूद करण्याचे आदेश दिले आहेत. याव्यतिरिक्त इतर माध्यमांतून १०० कोटी रुपये, असे एकूण ३०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली, असेही दीपक शास्त्री यांनी सांगितले.