अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर दाखल गुन्ह्यातील खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा(कलम ३०८) पोलिसांनी मागे घेतला आहे. विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वी पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरील हेच कलम वगळले होते. पोलिसांची ही संभ्रमित भूमिका जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. परंतु त्यावेळी कार्यकर्त्यांनी धुडगुस घातल्याने पोलिसांनी संग्राम जगताप यांच्यासह आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार दादा कळमकर, अभिषेक कळमकर, कैलास गिरवले यांच्यासह २५० ते ३०० जणांवर गुन्हा दाखल केला. त्यात आरोपींवर ३५३, ३३३, १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ४२७, ३२३, ५०४ आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यात नंतर ३०८ कलम वाढवण्यात आले.याप्रकरणी पोलिसांनी आमदार संग्राम जगताप, आमदार कर्डिले, गिरवले यांच्यासह ३५ जणांना अटक केली. दरम्यान गिरवले यांचा कोठडीत मृत्यू झाला, तर आमदार जगताप यांनी तूर्तास तरी जामीन घेतलेला नाही. कर्डिलेंसह इतर ३३ जणांना नुकताच जामीन झालेला आहे. अटक आरोपींना जामीन मिळाल्यानंतर आता पोलिसांनी या गुन्ह्यातील कलम ३०८ वगळले आहे. या गुन्ह्याच्या तपासाकामी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. तपासामध्ये या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत आल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे ३०८ कलम वगळून ३३६ कलम (जीविताच्या सुरक्षेबाबत धोका निर्माण करणे) वाढवण्यात आले आहे. तसा अहवाल तपासी अधिकारी शरद गोर्डे यांनी जिल्हा न्यायालयात सादर केला आहे.पोलिसांची संभ्रमित भूमिकाकेडगाव येथील दगडफेक व पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला या दोन्ही गुन्ह्णांत आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे हे ३०८ कलम लावण्यात आले. विशेष म्हणजे या दोन्ही गुन्ह्णांत पोलीस कर्मचाऱ्यांनीच फिर्याद दिलेली आहे. परंतु तरीही हे कलम वगळण्याची नामुष्की पोलिसांवर आली. गुन्ह्याता तथ्य नव्हते तर हे कलम का लावले आणि लावले तर मग मागे का घेतले, या पोलिसांच्या संभ्रमित भूमिकेची चर्चा सध्या जिल्हाभर होत आहे.एकाला शिक्षा, दुस-याला दिलासापोलिसांनी शिवसेना व राष्ट्रवादीच्या आरोपींवरील ३०८ कलम वगळले असले, तरी यात राष्ट्रवादीच्या अटक आरोपींना ३०८ कलमांन्वये कारवाईला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांना रितसर जामीन मिळाला. दुसरीकडे शिवसैनिक हे कलम वगळल्यानंतर पोलिसात हजर झाले. त्यामुळे या कलमामुळे एकाला शिक्षा, तर दुस-याला दिलासा मिळाला आहे.