अहमदनगर, दि. 21 - अहमदनगरमधील परिट वस्तीवर पुराच्या पाण्यात अडकलेल्या 31 नागरिकांची लष्कर व एनडीआरएफच्या जवानांनी सुखरुप सुटका केली आहे. बुधवारी (20 सप्टेंबर ) अरणगाव येथील तलाव फुटल्यानंतर आलेल्या पुराचा वाळुंज येथील परिट वस्तीला वेढा पडला. संध्याकाळपासून हे सर्व जण पुराच्या पाण्यामध्ये अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री अडीच वाजता एनडीआरएफचं पथक पुण्याहून घटनास्थळी पोहोचले व बोटींच्या सहाय्यानं जवानांनी नागरिकांना सुखरुप बाहेर काढले.
तर दुसरीकडे, नागरिकांची सुटका होईपर्यंत रात्रभर तहसिदार सुधीर पाटील, गटविकास अधिकारी वसंत गारुडकर, जिल्हा परिषद सदस्य संदेश काले हे मदत कार्यादरम्यान तळ ठोकून होते.
तलाव फुटला, वस्तीला पुराचा वेढाबुधवारी ( 20 सप्टेंबर ) अरणगाव येथील तलाव फुटल्यानंतर आलेल्या पुराचा वाळुंज येथील परिट वस्तीला वेढा पडला. त्यात 35 गावकरी अडकल्याची माहिती समोर आली. यानंतर रात्री पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती सहाय्यता पथकाला पाचारण करण्यात आले होते.पुराचे पाणी वस्तीपर्यंत पोहोचल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली.त्यामुळे काही गावकरी उंचावर गेले तर काहींना घराच्या छताचा आधार घ्यावा लागला. सायंकाळी तहसीलदार सुधीर पाटील घटनास्थळी दाखल झाले. मात्र गावकरी ४०० ते ५०० मीटर अंतरावरील पाण्यात अडकल्याने तेथे पथकाला पोहोचता येत नव्हते. सायंकाळी लष्कराच्या 40 सैनिकांची तुकडी घटनास्थळी दाखल झाली, मात्र त्यांनाही वस्तीपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. बोटी नसल्याने मदतकार्यात अडथळा आला. शेवटी रात्री दहाच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती सहाय्यता पथकाला पाचारण करण्यात आले होते. व त्यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरुप वाचवलं.