अहमदनगर : बिबट्याने गायीची शिकार केल्याच्या घटना नेहमी घडत असतात. ३० ते ३५ गायींनी एकत्रित हल्ला करून शिकारीसाठी गोठ्यात घुसलेल्या बिबट्याला ठार केल्याची विलक्षण घटना शनिवारी रात्री संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथे घडली. विशेष म्हणजे या हल्ल्याच्या वेळी गोठ्याबाहेर असलेल्या दुसऱ्या बिबट्याने धूम ठोकली.
उंबरी-बाळापूर शिवारातील कारवाडी परिसरातील उंबरकर वस्तीवरील सूर्यभान रावसाहेब उंबरकर यांच्या गट नं. १८२मध्ये घर व गायींचा मुक्त गोठा आहे. त्यामध्ये ३० ते ३५ जनावरे आहेत. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास या गोठ्यात एका बिबट्याने मागील बाजूने प्रवेश केला. त्यामुळे गायी सैरावैरा पळत सुटल्या. तसेच त्यांनी मोठमोठ्याने हंबरडा फोडत, बिबट्याचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली.
हा आवाज ऐकून उंबरकर कुटुंबीयांनी गोठ्याकडे धाव घेतली. यावेळी त्यांना एक बिबट्या या गायींच्या पायाखाली तुडवला जात असल्याचे, तर दुसरा गोठ्याबाहेर उभा असल्याचे दिसले. लोक जमा झालेले पाहताच बाहेरच्या बिबट्याने धूम ठोकली.वासरू जखमीयाबाबत तत्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली. वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा गायीच्या पायाखाली दीड वर्षाचा नर जातीचा बिबट्या मृत झाल्याचे आढळले, तसेच एक वासरू बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते.