अहमदनगर : येथील वाडिया पार्क मैदानावर २१ ते २३ असे तीन दिवस छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे सामने रंगणार आहे. विजेत्या मल्लाला ३५ लाख रुपयांची मानाची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे. माती व गादी अशा दोन विभागात ही स्पर्धा रंगणार आहे. शुक्रवारी उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे संयोजक सुवेंद्र गांधी यांनी दिली.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना व जिल्हा तालीम संघ यांच्या संयुक्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी वाडियापार्क मैदानावर भव्य स्टेज उभारणीचे तसेच माती व गादीचे आखाडे तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. वाडिया पार्क मैदानावर १५० फूट बाय ५० फूट असे भव्य आखाडा स्टेज, ६० फूट बाय २० फुटाचे भव्य व्यासपीठ तसेच ६० फूट बाय ६० फुटाचे व्हीआयपी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. स्टेजच्या मागे किल्ल्याची प्रतिकृतीचे चार बुरुज उभारण्यात आले आहेत. तसेच वाडिया पार्क मैदानाच्या सर्व प्रवेशद्वारांवर कमानी उभारण्यात आल्या आहेत. सुमारे १० ते १५ हजार नागरिकांची आसन क्षमता येथे आहे. स्पर्धा तिन्ही दिवस सकाळी ७ ते ९ व दुपारी चार ते रात्री १० वाजेपर्यंत कुस्तीचे सामने रंगणार आहेत.
गुरुवारी सकाळी रोजी सकाळी शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सर्जेपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरा पर्यंत हि शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेसाठी बेळगाव निपाणी येथून खास हात्ती आणला आहे. तसेच शोभायात्रेत घोडे, उंट यासह ढोल-ताशा, तुतारी, हलगी पथकांचा समावेश असेल. या शोभायात्रेत स्पर्धेत सहभागी झालेले एक हजाराहून अधिक मल्ल सहभागी होणार आहेत. तसेच शोभायात्रेत दोन व्हेन्टेज कारमध्ये प्रमुख पैलवान बसणार आहेत, अशी माहिती संयोजक अनिल शिंदे यांनी दिली.
गुरुवारी राज्यभरातील मल्ल नगरमध्ये दाखल झाले असून, त्यांची वजनमापे घेण्यात येऊन नाव नोंदणी करण्यात आली आहे. या मल्लाची राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. मल्लांच्या वजनाप्रमाणे गट तयार करण्यास सुरवात झाली आहे, अशी माहिती तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी दिली. छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे वसंत लोढा, अभय आगरकर, महेंद्र गंधे, दिलीप सातपुते, भानुदास बेरड, सचिन जाधव, बाबूशेट टायरवाले, सचिन पारखी, सुभाष लोंढे व प्रशांत मुथा आदी प्रयत्नशील आहेत.