अरुण वाघमोडे
अहमदनगर: घंटागाड्यांची संख्या अपुरी असल्याने शहरातील कचरा संकलन विस्कळीत झाल्याने ठेकेदार संस्थेकडून आणखी ३५ गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. येत्या महिनाभरात या गाड्या ताफ्यात दाखल होणार आहेत. कचरा संकलन सुरळीत करण्यासाठी मनपाने खरेदी केलेले नवीन चार कॉम्पॅक्टर कार्यन्वित करण्यात आले असल्याचे ठेकेदार संस्थेकडून सांगण्यात आले.
गुजरात येथील श्रीजी एजन्सी या संस्थेमार्फत शहरात कचरा संकलन व वाहतुकीचे काम केले जात आहे. महापालिकेने या संस्थेला दिलेल्या ६५ घंटा गाड्यांपैकी १५ ते २० गाड्या बंद अवस्थेत आहेत. ठेका घेतानाच याबाबत मनपाला संस्थेकडून कळवण्यात आले होते. मात्र, अद्यापही या गाड्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. दरम्यानच्या काळात ठेकेदार संस्थेने नवीन २० गाड्या सेवेत दाखल केल्या. मात्र, या गाड्या अपुऱ्या पडत असल्याने कचरा संकलन विस्कळीत झाल्याने नागरिक, नगरसेवकांकडून तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करून शहरातील कचरा संकलनाची वस्तुस्थिती मांडली होती. दरम्यान मनपा प्रशासनाने ठेकेदार संस्थेला गाड्यांची संख्या वाढवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठेकेदार संस्थेने नवीन ३५ गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक ते दीड महिन्यात टप्प्याटप्प्याने या गाड्या सेवेत दाखल होणार आहेत. तसेच संकलित केलेला कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्यासाठी कॉम्पॅक्टरची संख्याही वाढवण्यात आली आहे. मनपाने नव्याने खरेदी केलेले चारही कॉम्पॅक्टर सेवेत दाखल करण्यात आले आहेत. शहरात ठिकठिकाणी पडलेला कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, मागील तीन ते चार दिवसांत शहरात विविध ठिकाणी पडलेला कचरा उचलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरात सध्या ७२ घंटागाड्या, १० कॉम्पॅक्टर, दोन टेम्पो व काही ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलनाचे काम सुरू असल्याचे ठेकेदार संस्थेकडून सांगण्यात आले.