रोहित टेके ।
कोपरगाव : शहरातील गावठाण हद्दीत दगड- माती आणि चुन्याच्या बांधकामातील जुन्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. एकूण ३८ जुन्या इमारती धोकादायक बनल्या आहेत.
कोपरगाव शहराचे पूर्वीचे मूळ गावठाण असलेल्या भागात त्याकाळी दगड, माती, चुना, सागवानी लाकडाचा वापर करून दोन- तीन मजली अनेक इमारतीची निर्मिती केलेली आहे. या इमारतींना जवळपास ५० वर्षे झाली आहेत. काळानुरूप काही इमारती पाडून त्याजागी नवीन सिमेंट कॉन्क्रिटच्या इमारती उभ्या राहिल्या आहे. त्यातील काही इमारती आजही दुर्लक्षित झाल्या आहे. त्या आज मोडकळीस आल्या आहेत.
मोडकळीस आलेल्या इमारतीच्या आजूबाजूला भरपूर नवीन इमारती, घरे झाली आहेत. वर्दळ देखील वाढली आहे. त्यामुळे या इमारती कधीही कोसळून काही दुर्घटना घडू शकते. पावसाळा सुरु झाला आहे. विशेष म्हणजे यातील मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये डागडुजी करून आजही काही कुटुंब त्यात राहत आहेत.
नगरपरिषदेच्या नोटिसीकडे होते दुर्लक्ष
गेल्या अनेक वर्षापासून नगरपरिषद या इमारत मालकांना पावसाळ्याच्या सुरुवातीला नोटीस बजावते. परंतु इमारत मालक याकडे गांभीर्याने न घेता दुर्लक्षच करीत असल्याचे या इमारतींची जैसे थे अवस्था बघितल्यावर लक्षात येते.
कोपरगाव शहरातील मोडकळीस आलेल्या धोकादायक ३८ इमारतीच्या मालकांना जून महिन्याच्या सुरुवातीलाच नोटिसा बजावल्या आहे. त्यातील जुन्या गावठाणातील एक जास्तच धोकादायक इमारत उतरून घेतली आहे. - सुनील गोर्डे, उपमुख्याधिकारी, नगरपरिषद कोपरगाव