नेवासा : गेल्या चार महिन्यांपासून नेवासा परिसरात दरोडे, जबरी चोरी, घरफोड्या करून धुमाकूळ घालत असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी नेवासा पोलिसांनी जेरबंद केली. या टोळीवर विविध पोलीस ठाण्यांत तब्बल ३८ गुन्हे दाखल आहेत.
गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या तपास पथकाने जेरबंद केले.
यामध्ये अतिष सूरज पवार (रा. प्रवरासंगम, ता. नेवासा), मुन्ना उर्फ रोहित गोडाजी चव्हाण (रा. अशोकनगर ता. श्रीरामपूर), ज्ञानेश्वर रावसाहेब पिंपळे (रा. जुने कायगाव, ता. गंगापूर), करण उर्फ दादू भीमा पवार (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) व एक अल्पवयीन अशा पाच गुन्हेगारांना अटक करण्यात आली. तीन आरोपी फरार आहेत.
अटक केलेल्या आरोपींकडून आठ गुन्ह्यांची उकल झाली असून, यामध्ये तालुक्यातील शिरसगाव येथे श्रेयस मेडिकल चोरी, खडका फाटा येथे हॉटेल औदुंबरसमोर महामार्गावर ट्रक चालकास अडवून केलेली रस्तालूट, सलाबतपूर येथील साहिल कलेक्शनमधील झालेली चोरी, जेऊर हैबती, भेंडा बुद्रूक येथील चोरी, नेवासा फाटा येथील बुलेट चोरी, माळीचिंचोरा येथे महामार्गावर ट्रकचालकाची लूट, बाभूळवेढा येथील घरफोडी अशा आठ गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिली. बुलेटसह काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक विजय करे यांना खबऱ्याकडून माहिती मिळताच त्यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस नाईक महेश कचे, पोलीस नाईक राहुल यादव, पोलीस नाईक सुहास गायकवाड, पोलीस नाईक जयवंत तोडमल, संदीप गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल वसीम इनामदार, गणेश इथापे, भागवत शिंदे यांनी ही कामगिरी पार पाडली.