अहमदनगर : जिल्ह्यातील ३ लाख ९० हजार शेतक-यांनी शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यातील अवघ्या २६ शेतक-यांना कर्जमुक्तीचा लाभ देऊन त्यांची दिवाळी शासनाने गोड केली आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी हा कर्जमुक्तीचा सोहळा आनंदाने साजरा करुन कर्जमुक्त झालेल्या शेतक-यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र पालकमंत्री राम शिंदे वाटणार आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत केलेल्या घोषणेनुसार शेतक-यांच्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीस दिवाळीपूर्वीच प्रातिनिधिक स्वरुपात अंमलबजावणी होत आहे. या योजनेचा शुभारंभ मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तर हाच कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटण्याचा कार्यक्रम पालकमंत्री राम शिंदे जिल्हास्तरावर घेणार आहेत.कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यातील ३ लाख ९० हजार शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची तपासणी करुन लाभार्थ्यांची यादी येणार आहे. या यादीतूनच जिल्हास्तरावरील कार्यक्रमासाठी २५ जोडप्यांची निवड केली जाणार आहे. तसेच मुंबईच्या कार्यक्रमासाठी १ लाभार्थी शेतकरी किंवा एक शेतकरी जोडपे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
लाभार्थींची नावे मिळेनात
राज्य शासनाकडून पात्र लाभार्थींची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे. मात्र, अद्याप ही यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला मिळालेली नाही. त्यामुळे नक्की कोणत्या शेतक-यांना कर्जमाफी मिळणार आहे, याबाबत संदिग्ध वातावरण आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मात्र या विषयावर कोणतीही भूमिका व्यक्त केली नाही.