लवकरच आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीतून आरोग्य केंद्राचे कामकाज सुरू होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी लवकरच त्यांची भेट घेणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांनी सांगितले. बारागाव नांदूर गावातील जिल्हा परिषद आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली होती. खचलेल्या इमारतीमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करीत होते. रुग्णांना उपचारापेक्षा इमारतीच्या जीर्ण अवस्थेची अधिक चिंता वाटत होती. जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य स्व. शिवाजीराजे गाडे यांनी सन २०१८ मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्राला निधी मिळावा म्हणून प्रयत्न केले. मंत्रालयातून दोनच आरोग्य केंद्रांना निधी मिळेल, असे सांगण्यात आले. जिल्ह्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींचा प्रश्न निर्माण होता. बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्राला निधी देण्याबाबत चर्चा सुरू झालेली असताना बारागाव नांदूर गावातील इमारतीचा विषय व रुग्णांची परिस्थिती स्व. शिवाजीराजे गाडे यांनी मंत्रालयात यथोचित मांडली. परिणामी जिल्हा परिषदेच्या वतीने बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. ३ कोटी रुपये खर्च करून इमारत उभी केली असून स्व. शिवाजीराजे गाडे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन होणार असल्याचे जि.प. सदस्य गाडे यांनी सांगितले.
.................
बारागाव नांदूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत उभारली. लवकरच इमारतीतून प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णसेवेला प्रारंभ होईल. परंतु संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असलेली रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. आरोग्य प्रशासनाने बारागाव नांदूर जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रामधील सर्व रिक्त पदे भरावीत.
- धनराज गाडे, सदस्य, जिल्हा परिषद