राहुरी (जि. अहमदनगर) : राहुरी तालुक्यातील गुहा फाटा येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर कंटेनर क्रुझर जीप व दोन मोटरसायकल या चार वाहनांचा गुरुवार 16 डिसेंबर रोजी रात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये क्रुझर जीप मधील पर राज्यातील तीन साईभक्त जागीच ठार झाले आहेत. तर सात जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजत आहे.
शिर्डी वरुन नऊ भाविकांना घेऊन जीप (एमएच २० एफजी १४०१) शनिशिंगणापूर येथे चालली होती. तर, कंटेनर (एचआर ४५-बी- ४४७०) मनमाडच्या दिशेने चालला होता. नगर-मनमाड महामार्गावर सहापदरी रस्त्याचे काम सुरू असल्याने, गुहा येथे एका बाजूने रस्ता बंद करून, एकेरी वाहतूक चालू होती. त्यामुळे, जीप व कंटेनरची समोरासमोर भीषण धडक झाली. कंटेनर व जीप रस्त्याच्या खाली उतरले.
दरम्यान, कंटेनर-जीपची धडकेत दोन दुचाकी सापडल्या. दुचाकी (एमएच १५ एचबी ९५७४) वरील एक जण गंभीर, तर एक जण किरकोळ जखमी झाले. दुसऱ्या दुचाकीवरील एक जण किरकोळ जखमी झाला. जीपमध्ये सात जण मध्यप्रदेश मधील होते. पुष्पा जयस्वाल (रा. सेलुल, मध्य प्रदेश) जागीच ठार झाल्या. इतर दोन मृतांची नावे समजली नाहीत. जीप चालक रमेश घोडके (मूळ रा. मंठा, जि. जालना, हल्ली रा. शनिशिंगणापूर), जीपमधील पाच जण गंभीर जखमी असल्याचे समजते. त्यांची नावे समजली नाहीत.
अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, प्रेरणा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना चार रुग्णवाहिकेतून राहुरी व नगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे रस्त्यावर वाहनांची रांग लागली होती. रात्री साडेनऊ वाजता अपघातग्रस्त वाहने काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याकामी राहुरी, देवळाली प्रवरा, लोणी येथील रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या होत्या. अपघात समयी शिर्डी संस्थांनचे विश्वस्त सुरेश वाबळे, अविनाश ओहळ, चंद्रकांत थोरात, विकी लांबे, रामा बर्डे, सागर सोनवणे ,अमोल सोनवणे, अमर वाबळे, शरद वाबळे, चिंचोलिचे सरपंच गणेश हारदे, देवळालीचे नगरसेवक आदिनाथ कराळे यासह गुहा, चिंचोली, देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी येथील नागरिकांनी मदत केली.