घोडेगाव : गुन्ह्यांची उकल होऊन गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी घोडेगाववर अत्याधुनिक ४० सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहेत. यासाठी लोकसहभागातून अंदाजे ५ लाख रूपयांचा खर्च केला जाणार आहे.मंगळवारी नूतन सरपंच राजेंद्र देसरडा यांच्या अध्यक्षतेखाली घोडेगाव ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सोनई पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक कैलास देशमाने यांची प्रमुख उपस्थिती होती. देशमाने व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांच्या संकल्पनेतून हे कॅमेरे बसविले जात आहेत. या बैठकीस घोडेगाव मेडिकल असोसिएशन , घोडेश्वरी प्रतिष्ठान, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होता. कॅमेरे बसविण्याच्या योजनेसाठी अकरा सदस्यीय दक्षता समिती कामकाज पाहणार आहे.नियोजन बैठकीतच उपस्थित नागरिकांनी यावेळी स्वयंस्फूर्तीचे अडीच लाख रूपयांची देणगी जाहीर केली. सोनई पोलीस ठाण्यास आय. एस. ओ. मानांकन मिळाल्याबद्दल सहायक निरीक्षक देशमाने यांचा सरपंच देसरडा यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सोनई पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांनी यावेळी ११ हजार रूपयांची देणगी जाहीर केली.या बैठकीस भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य दीपक जाधव, वसंत सोनवणे, डॉ. सुनील चौधरी,सचिन चोरडिया, रामदास सोनवणे, महावीर नहार, मनोज बोरूडे, संजय चेमटे, शादाब शेख, संजय सोनवणे, भाऊसाहेब व्यवहारे, चंद्रकांत शिंदेंसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी ए. एस. गाडगे यांनी आभार मानले.