लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महापालिकेने पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू केली आहेत. शहरातील सीना नदीपात्रासह नाल्यांची चार पोकलँड व जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छता सुरू असून, नालेसफाईचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
महापालिकेने पावसाळ्यापूर्वीची कामे हाती घेतली आहेत. बांधकाम विभागाकडून नालेसफाईसाठी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. पावसाने हजेरी लावल्याने मनपाने नालेसफाईच्या कामाला गती दिली आहे. सीना नदीपात्राच्या वारुळाचा मारुती येथून स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या कल्याण रोडच्या बाजूने हे काम सुरू आहे. सावेडी उपनगरातील निर्मलनगर ते गावडे मळा, जाधव मळा, गजराजनगरपर्यंत नाल्यातील गाळ काढण्यात आला आहे. सारसनगर भागातील भिंगार नाल्याच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. बोरुडे मळा भागातील नाल्याची पोकलँडच्या साहाय्याने स्वच्छता करण्यात येत आहे. केडगाव उपनगरातील ओढ्यांतील गाळ काढण्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने सुरू करण्यात आले आहे. सीना नदीपात्रात बोरुडे मळा ते लोखंडी पुलापर्यंत जलपर्णी आहे. त्यामुळे सीना नदी पात्र स्वच्छ करण्यास विलंब होत असून, हे काम ठाणगे मळ्यापर्यंत पूर्ण झाले आहे.
शहरातील जुने आरटी कार्यालय परिसरातील नाल्यांची साफसफाई अद्याप सुरू झालेली नाही. तसेच कुष्ठधाम, नरहरीनगर आदी भागांतील नाल्यांचे काम अपूर्ण असून, हे काम पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. खोकरनाल्याची साफसफाई पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
...
नाल्यांतील अतिक्रमणे ‘जैसे थे’
शहरातील ओढे व नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. नाल्यांचा आकार कमी झाला आहे. काही ठिकाणी तर जेसीबीही बसत नाही. त्यामुळे नालेसफाई झालेली नाही. अशा ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे.
......
फोटो- ३१ नालेसफाई
...
महापालिकेने पावसाळ्यापूर्वीची कामे हाती घेतली आहेत. नालेसफाईचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. सीना नदीपात्राच्याी स्वच्छता करण्यात येत असून, चार पोकलँड आणि दोन जेसीबीच्या साहाय्याने सफाईचे काम सुरू आहे.
- सुरेश इथापे, शहर अभियंता, मनपा