श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळा महादेव येथील ओढ्यामध्ये दोन दिवसापूर्वी सुमारे ३० ते ४० वेरुळा जातीचे मृत साप आढळून आले आहेत.
वन विभागाच्या कर्मचा-यांनी जेसीबीच्या मदतीने हे साप बाहेर काढले. काही सापांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. मासे पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यामुळे ही घटना घडल्याचे वनक्षेत्रपाल विकास पवार यांनी सांगितले.
गावालगत असणाºया ओढ्यामधून शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी पाहणी केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर साप तरंगलेल्या स्थितीत दिसून आले. घटनेची बातमी पसरताच मोठी गर्दी झाली.
वनक्षेत्रपाल विकास पवार हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर गावक-यांच्या सहकार्य घेत जेसीबीच्या मदतीने साप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. शवविच्छेदनानंतर वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठविण्यात येणार आहे. दोषी व्यक्तीवर कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.