भेंडा : भेंडा (ता. नेवासा) परिसरात बुधवारी झालेल्या पावसाची नोंद लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पर्जन्यमापकावर ४० मिलीमीटर इतकी झाली आहे. आजअखेर परिसरात ४४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
भेंडा परिसरात ५०० ते ५५० मिलीमीटर इतका पाऊस पडतो. अजूनही पावसाने सरासरी गाठलेली नाही. परंतु, या आठवड्यात असाच पाऊस राहिला तर पावसाची सरासरी पूर्ण होऊ शकते. गुरुवारी दुपारीही पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान होईल. ऊस, बाजरी, कपाशी, तूर, कांदा, डाळींब, केळी यासह इतर पिकास हा पाऊस फायदेशीर आहे. सलग दोन दिवस झालेल्या पावसाने ओढ्याला पाणी आले आहे. जमिनीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे.