अहमदनगर : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात वर्षभरात ४० बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एकूण २ लाख ८६ हजार बालकांपैकी १ लाख ३१ हजार बालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ही हृदयाची लक्षणे असलेली बालके आढळली.महिला व बालकल्याण विभागातर्फे सर्व अंगणवाडी केंद्रात वर्षभर विविध टप्प्यांत आरोग्य तपासणी केली जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते ६ वयोगटातील बालकांच्या सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणी केली जाते.
यात वर्षभरात एकूण २ लाख ८६ हजार ९९४ बालकांपैकी १ लाख ३१ हजार ६०९ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यात ज्यांना हृदयरोगाची लक्षणे आढळली, त्यांची जिल्हा रुग्णालयात २-डी इको तपासणी झाल्यानंतर ४३ जणांच्या हृदयात छिद्र असल्याचे आढळले. त्यापैकी ४० बालकांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. तर, उर्वरित बालकांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय इतर आजार असलेली एकूण ९९ बालके आढळून आली. पैकी ९१ बालकांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले.
ईएनटीचे २४ रुग्ण
या बालकांंमधून २६ जणांना कान, नाक, घशाबाबतचे आजार आढळले. त्यातील २४ जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. याशिवाय ५ जणांवर अस्थिरोग शस्त्रक्रिया, ११ जणांवर हर्निया शस्त्रक्रिया करण्यात आली.सॅम बालकांच्या प्रमाणात घट
सॅम बालकांच्या (अतितीव्र कमी वजन गट) प्रमाणात गेल्या तीन वर्षांत घट दिसत आहे. विविध उपक्रम व उपाययोजना केल्याने ही घट झाल्याचे महिला बाल कल्याणचे म्हणणे आहे. २०२१ मध्ये ४९५ बालके सॅम गटात होती. ती संख्या २०२२ मध्ये २२१ व २०२३ मध्ये २२० पर्यंत खाली आली. २०२३ हे वर्ष शासनाने मल्टी मिलेट ईयर म्हणून घोषित केले होते. त्याचे औचित्य साधून जिल्ह्यातील कुपोषित बालकांना तृण धान्ययुक्त पौष्टिक आहार पुरविण्यासाठी जिल्ह्यातील कमी वजनाच्या बालकांसाठी नावीन्यपूर्ण योजना व विशेष घटक योजनेतून एकूण २२ हजार ६६३ लाभार्थ्यांना अतिरिक्त आहार म्हणून मल्टी मिलेट पौष्टिक बिस्किटे पुरविण्यात आली.