शेवगाव : शेवगाव, पाथर्डी तालुक्याने कापूस उत्पादनात गेल्या काही वर्षात मोठी आघाडी घेतली आहे. यंदा तालुक्यात कपाशीची विक्रमी ४०० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. शेवगाव, पाथर्डी तालुक्याचा शासनाच्या कापूस पथदर्शी प्रकल्पात समावेश करण्यात यावा. त्यातून कपाशीची उत्पादकता वाढून शेतकर्यांचा विकास व अधिक प्रगती शक्य होईल, अशी मागणी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केली. पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या शेवगाव तालुका खरीप हंगाम २०१४ आढावा बैठकीत आमदार घुले अध्यक्षपदावरून बोलत होते. जि.प.च्या समाजकल्याण समितीचे सभापती प्रा. शाहुराव घुटे, उपसभापती अरुण लांडे, उपविभागीय कृषी अधिकारी गोरक्षनाथ लोखंडे, कृषी विकास अधिकारी विलास नलगे, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या काही वर्षात शेवगाव तालुक्याने कापूस उत्पादनात मोठी आघाडी घेतली आहे. शेतकर्यांसमोर संकट येऊ नये याकरिता कृषी विभागाने सविस्तर नियोजन करावे. यंदाच्या हंगामात शेतकर्यांना मागणी प्रमाणे खते व बियाणे उपलब्ध व्हावी याकरिता शेतकरी गट व महिला बचत गटांना प्राधान्य मिळावे, अशी सूचना आ. घुले यांनी केली. तालुका कृषी अधिकारी रावसाहेब लवांडे यांनी तालुक्यात उसासह खरिपाचे ६३ हजार हेक्टर क्षेत्र असताना गेल्या काही वर्षात तालुक्याच्या भौगोलीक क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्रात खरीप पिके घेतली जातात. त्यात कापूस ५५ हजार, बाजरी १० हजार, तूर २ हजार अशा प्रमुख पिकांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात ५७ हजार ८७१ हेक्टर क्षेत्रात खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे. कपाशीच्या बियाणांची पाकिटे उपलब्ध झाली असून, त्यात शेतकर्यांची वाढती मागणी असलेल्या महिको ७३५१ या वाणाच्या ३५ हजार पाकिटांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत बाळासाहेब धोंडे, माधव काटे, भास्कर शिंदे, अंबादास कळमकर, बबनराव भुसारी, अरुण पवार, जगदीश धूत, द्वारकानाथ लाहोटी, मधुकर वावरे आदींसह शेतकर्यांची उपस्थिती होती. कृषी अधिकारी वाल्मिक सुडके यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कपाशीची ४०० कोटींची उलाढाल
By admin | Published: May 21, 2014 12:04 AM