अहमदनगर : कोरोनावरील लसीकरणासाठी केंद्रांवर नागरिकांची झुंबड उडत असून, नगरमधील ४० हजार नागिरकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. दोन डोसमधील अंतर कमी होत असल्याने त्यांची चिंता वाढली आहे.
राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागिरकांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे. या वयोगटातील नागिरकांना पहिला डोस दिला जात आहेत. कोरोनावरील लसीचे दोन डोसे घेणे गरजेचे आहे. नगरमध्ये आतापर्यंत ४५ वर्षांपुढील ५२ हजार २२६ नागरिकांना पहिला डोस दिला गेला. त्यापैकी १२ हजार १५४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. उर्वरित ४० हजार ७२ नागिरकांना दुसरा डोस प्राधान्याने द्यावा लागेल; परंतु सध्या लसीचा पुरवठा होत नसल्याने या नागरिकांचा दुसरा डोस घेणे लांबणीवर पडत असून, दोन डोसमधील कालावधी वाढल्यास त्याचा लाभ होईल का? यासह अनेक प्रश्न सध्या पहिला डोस घेणाऱ्यांना पडला आहे. मंगळवारी महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला गेला; परंतु मनपाकडे ३५० डोसच उपलब्ध होते. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना लस मिळाली नाही. कित्येक तास रांगेत उभे राहिल्यानंतर त्यांना लस संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त करत घर गाठले.
दुसरा डोस हवा असणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे; परंतु त्या प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. दररोज एका केंद्रावर साधारण ४०० ते ५०० नागरिकांची नोंद होते; परंतु कधी ५०, तर कधी १०० डोस उपलब्ध करून दिले जातात. दररोज या प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास ४० हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यास साधारण ४० दिवस लागतील. त्यात काहींनी पहिला डोस घेऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. म्हणजे पहिल्या डोसनंतर ८० दिवसांत दुसरा डोस, अशी अवस्था आहे. त्यामुळे दुसरा डोस किती प्रभावी ठरतो, याबाबत मतमतांतरे आहेत. त्यामुळे नागिरकांची चिंता वाढली असून, याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.
.....
असे झाले लसीकरण
कोव्हॅक्सिन
पहिला डोस- १०११०
दुसरा डोस- ७००५
.....
कोविशिल्ड
पहिला डोस- ३८,०६१
दुसरा डोस- ९,६७०