अहमदनगर : सहलींचे आयोजन सर्वच शाळांकडून केले जाते. मात्र जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी परीक्षेत विशेष गुण मिळवित सहलीची संधी मिळविली असून, जिल्ह्यातील ४२ विद्यार्थी सोमवारी दुपारी केरळला रवाना झाले. यावेळी पालकांनी जिल्हा परिषदेत मोठी गर्दी केली होती.जिल्हा परिषदेच्या सभागृहात सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. अध्यक्षा शालिनीताई विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, डॉ. दिलीप पवार उपस्थित होते.गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषदेने हा उपक्रम हाती घेतला आहे. सहलीत मिळणारे ज्ञान व अनुभवाचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल. सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना यानिमित्त विमान प्रवासासह आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम करणा-या इस्त्रो संस्थेला भेट देण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी परत आल्यावर आपले अनुभव इतर विद्यार्थ्यांना सांगून त्यांच्यामध्येही जागृती करावी, असे आवाहन यावेळी विखे यांनी केले.शिक्षण विभागाने निबंध लेखन स्पर्धा आणि प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे सहलीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये २३ मुली व १९ मुलांचा समावेश आहे. विद्यार्थी बेंगलूरू येथील सर विश्वेश्वरय्या म्युझियम, त्रिवेंद्रम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर, म्युझियम, साऊंड रॉकेट शो, प्राणी संग्रहालय व मत्स्यालयास भेटी देणार आहेत. पुण्याहून बेंगलूरुपर्यंतचा तसेच बेंगलूरूहून त्रिवेंद्रमपर्यंतचा प्रवास विमानाने होणार आहे. दि.१९ जानेवारी रोजी सहल नगरला पतरणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, गटशिक्षणाधिकारी रामदास हराळ, विकास साळुंके, शबाना शेख, निवेदिता जाधव, अमोल गोसावी रवाना झाले आहेत. विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी पालकांनीही मुख्यालयात गर्दी केली होती. दि.१९ जानेवारी रोजी सहल नगरला पतरणार आहे. यावेळी उपाध्यक्षा घुले, सदस्य संदेश कार्ले यांची भाषणे झाली.
अहमदनगर जिल्हा परिषद शाळेतील ४२ विद्यार्थी इस्त्रो सहलीला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 7:54 PM