आॅनलाइन लोकमतअहमदनगर, दि़ २२ - जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूने थैमान घातले असून, शासकीय रुग्णालयांमध्ये आत्तापर्यंत २१ जणांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून, खासगी रुग्णांलयांमध्येही स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जात आहे़ जिल्हाभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये तब्बल ४२ हजार ७६३ रुग्णांची स्वाईन फ्ल्यू तपासणी करण्यात आली आहे़स्वाईन फ्ल्यूबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठीही स्वतंत्रपणे कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेस राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. नितीन बिलोलीकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. डी. गांडाळ, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदी उपस्थित होते.१ जानेवारी २०१७ पासून संगमनेर, कोपरगाव, कर्जत, नेवासा व श्रीरामपूर येथे स्वाईन फ्ल्यूने एकूण १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ त्यापैकी संगमनेर-४, कर्जत-१, कोपरगाव-३, नेवासा-२, श्रीरामपूर-३ असे एकूण १३ जणांचा मृत्यू झाला असून सहवासितांना स्वाईन फ्ल्यू लक्षणे आढळल्यास टॅमिफ्ल्यूची औषधे देण्यात आलेली आहेत. तसेच ‘क’ कॅटेगिरीतील संशयित रुग्णांची संख्या १३२ इतकी असून त्यांना टॅमिफ्ल्यू औषधोपचार देऊन बरे करण्यात आलेले आहे. सध्या २१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत़ ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वाईन फ्ल्यू तपासणी करण्यात येते. आतापर्यंत ४२ हजार ७६३ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
४२ हजार रुग्णांची ‘स्वाईन फ्ल्यू’ तपासणी
By admin | Published: April 22, 2017 3:07 PM