अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात तब्बल ४९४ मतदान यंत्रांत बिघाड झाल्याने हजारो मतदार मतदानापासून वंचित राहिले. त्यामुळे अनेक ठिकाणी फेरमतदानाची मागणी करण्यात आली. परंतु प्रशासनाने ती फेटाळली. दरम्यान, बिघडलेली यंत्रे बदलण्यात मोठा वेळ गेल्याने निवडणूक प्रक्रिया लांबली. काही मतदार मतदान न करता निघून गेले, तर काही ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत मतदान सुरू होते.अहमदनगर मतदारसंघात २३ एप्रिल रोजी मतदान झाले. एकूण २०३० मतदान केंद्रांवर येथे ४०६० बॅलेट युनिट, २०३० कंट्रोल युनिट व २०३० व्हीव्हीपॅट मशीनची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु यातील ३१८ यंत्रे तर मॉकपोल दरम्यानच बंद पडली. त्यात १८७ बॅलेट युनिट, ४८ कंट्रोल युनिट व ८३ व्हीव्हीपॅटचा समावेश होता. त्यामुळे ती बदलताना कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. तोपर्यंत सकाळी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.त्यानंतर प्रत्यक्ष मतदान होताना दिवसभर एकूण १७६ यंत्रांत बिघाड झाला. त्यात ५७ बॅलेट युनिट, २५ कंट्रोल युनिट व ९४ व्हीव्हीपॅटचा समावेश होता. अनेक ठिकाणी अर्धा ते दोन तासांचा अवधी ही यंत्रे बदलण्यास लागत होता. कारण प्रत्येक केंद्रावर राखीव यंत्र नव्हते. ते गोडावूनमधून मागवावे लागत होते. त्यात मोठा वेळ जात होता. तोपर्यंत मतदार रांगेत थांबत होते, तर काही कंटाळून निघून जात होते. पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी, वैजूबाभूळगाव येथे दुपारी बंद पडलेली यंत्रे सायंकाळी सहापर्यंत सुरू झाली नव्हती. यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.
पोलिंग एजंटच्या सह्या न घेताच यंत्र सीलपाथर्डी तालुक्यातील वैजू बाभूळगाव येथे दुपारी पावणेदोन वाजता मतदान यंत्र बंद पडले. त्यावर कर्मचाऱ्यांनी तेथे तीन मशीन्स बदलले, परंतु सायंकाळी सहापर्यंत मशीन सुरू झाले नाही. सहानंतर मशीन सुरू झाले, तेव्हा सर्व मतदार निघून गेले होते. त्यामुळे येथे फेरमतदान घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. परंतु मतदान कर्मचाºयांनी यंत्रे सील करण्याची प्रक्रिया सुरू केली. येथे एकूण ११२२ मतदान होते, त्यापैकी केवळ ३४१ मतदान झाले. मोठ्या प्रमाणात मतदार वंचित राहिल्याने आम्ही यंत्रे सील करताना सह्या करणार नसल्याचे दोन्ही पक्षांच्या पोलिंग एजंटांनी सांगितले. मात्र, तरीही कर्मचाºयांनी तशीच यंत्रे सील केली, अशी माहिती उपसरपंच अविनाश आठरे यांनी दिली.शिराळ चिचोंडीत तीन तास यंत्र बंदपाथर्डी तालुक्यातील शिराळ चिंचोडी येथील १९७ व १९८ या मतदान केंद्रावरील यंत्रे दुपारी तीन वाजता बंद पडली. मशीन बदलण्यास सायंकाळचे सहा वाजले. याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार संग्राम जगताप मतदान केंद्रावर पोहोचले होते़दरम्यान, कंटाळून मतदार निघून गेले, तर काही ताटकळले. त्यामुळे ग्रामस्थांनी फेरमतदान घेण्याची मागणी केली. त्यामुळे ग्रामस्थांनी फेरमतदानाची मागणी केली.याबाबत राष्ट्रवादीनेही निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे फेरमतदान घेण्याची मागणी केली. यावर बुधवारी जिल्हाधिकाºयांकडे सुनावणी झाली. त्यात ही मागणी फेटाळली.