नेवासा : नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात पोलिसांनी छापा मारुन ४ लाख ७० हजार तर नेवासा येथे ८५ हजार रुपयांची बनावट दारु असा सुमारे साडेपाच लाख रुपयांची दारु पकडण्यात आली.गुरुवारी (दि. ७) सकाळी नेवासा येथे एम. एच. १५, एफ. ८९३२ या मारुती कारमधून बनावट दारुचे सहा बॉक्स वाहून नेण्यात येत होते. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यांनी नेवासा येथे ही कार अडवून तपासणी केली असता गाडीत ८५ हजार ६४० रुपयांची बनावट विदेशी मद्य आढळून आले. दरम्यान या कारचा चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक बी. टी. घोरतळे हे करीत आहेत.बुधवारी (दि़ ६) रात्री पाचेगाव शिवारातील अकील रफीक सय्यद यांच्या वस्तीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा मारला. यात गोवा राज्यातून महाराष्ट्रात विक्रीस आणलेल्या रिअल ७ व्हिस्कीचे ७५ बॉक्स, रॉयल ७ व्हिस्कीचे ७१ बॉक्स, गोल्डन ब्ल्यू व्हिस्कीचे ४६ बॉक्स असा एकूण ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यावेळी आरोपी फरार झाला असून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कुसळे हे करीत आहेत. एस. आर. वाघ, कदम, चत्तर, पाटोळे यांनी ही कारवाई केली.
नेवाशात साडेपाच लाखाची दारु जप्त; पाचेगाव शिवारात पोलिसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 11:45 AM