अहमदनगर : कोणतीही पूर्व परवानगी न घेता ग्रामपंचायतच्या मासिक सभांना सतत दांडी मारणा-या नगर तालुक्यातील वडारवाडी येथील माजी सरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी अपात्र ठरविले आहे. या सदस्यांना सभांना उपस्थित राहण्याच्या नोटीसा बजाऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने कारवाई करण्यात आली आहे.वडारवाडी येथील उपसरपंच कैलास पगारे, रंजना सपकाळ, विनू इस्सर, नंदकुमार अहिरे, योगेश भुजबळ हे ५ ग्रामपंचायत सदस्य ३० एप्रिल २०१६ ते २५ ओक्टोंबर २०१६ पर्यंत पूर्व परवानगी शिवाय सतत गैरहजर राहिले. यातील इस्सर या वडारवाडीचे माजी सरपंच आहेत तर पगारे उपसरपंच आहेत. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ४० (१) (ब)नुसार सतत गैरहजर राहिल्यास ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरतो. नोटिसांना या सदस्यांनी कोणतेही उत्तर किंवा लेखी खुलासा केला नाही. यामुळे अध्यक्षा विखे यांनी या ५ सदस्यांना अपात्र ठरवले आहे.