श्रीगोंदा : श्रीगोंदा शहराजवळील भिंगाण येथील पाच वर्षाच्या बालकांचे बालदिनाच्या पूर्वसंध्येला अपहरण करण्यात आले असून, हे अपहरण संपत्तीच्या वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या अपहरणाला दोन दिवस उलटले तरी त्याचा तपास लागू शकला नाही. वैभव बापू पारखे असे या अपहृत चिमुरड्याचे नाव आहे.बापू पारखे यांना लग्नानंतर ब-याच वर्षांनी मुलगा झाला. त्याचे नाव वैभव ठेवले. सोमवारी (दि़ १३) सायंकाळी वैभव हा घराच्या अंगणात खेळत असताना त्याचे अपहरण करण्यात आले. याबाबत वैभवचे वडील बापू पाखरे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेला दोन दिवस उलटले तरी त्याचा अद्याप तपास लागू शकलेला नाही. संपत्तीच्य वादातून किंवा नरबळीसाठी वैभवचे अपहरण करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणात वैभवचा जवळचा एक नातेवाईकच पोलिसांच्या रडारवर असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या या नातेवाईकाकडे कसून चौकशी सुरु आहे. लवकरच या अपहरणाचे बिंग फुटेल, अशी शक्यता पोलीस वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे. या तपासाची सुत्रे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी हातात घेतली आहेत.
संपत्तीच्या वादातून भिंगाण येथील पाच वर्षाच्या बालकाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:34 AM