अहमदनगर : ''जिंदगी सहीसलामत जिना चाहता है तो पचास लाख रुपये देना पडेगा, पुलीस के पास गया तो तेरी जान सौ टका जायेगी'' अशी फोनवरून धमकी देत व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.
राहुल सुखदेव गायकवाड (वय ३१, रा. कोहकडी, ता. पारनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राहुल गायकवाड याने कोहकडी येथील जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारा गणेश सीताराम गायकवाड याला १४ ते १७ मार्च दरम्यान फोन करून जिवे मारण्याची धमकी देत खंडणी मागितली होती. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीस गुरुवारी जेरबंद केले. आरोपी राहुल गायकवाड यांच्या विरोधात पारनेर, सुपा व औरंगाबाद येथील छावणी पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.