साहेबराव नरसाळेअहमदनगर : एकीकडे खऱ्या अपंगांना वर्ष-वर्ष चकरा मारूनही अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळत नाही, तर दुसरीकडे जिल्ह्यात बनावट अपंग प्रमाणपत्र वाटल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली. आता जिल्हा रुग्णालयाकडून एकाच वर्षात तब्बल ५ हजार ४४१ अपंगांची प्रमाणपत्रे वाटल्याची माहिती समोर आली आहे.जिल्हा रुग्णालयाकडून तपासणी करून दिव्यांगांना अपंगत्वाची प्रमाणपत्रे दिली जातात. या प्रमाणपत्रांनंतर शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळतो. जिल्हा रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगांना मोठे दिव्य पार पाडावे लागते, याबाबत ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठविला़ जिल्हा रुग्णालयाच्या या मनमानी कारभाराविरोधात प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेनेही आवाज उठविला होता. मागील महिन्यात जिल्हा समाज कल्याण अधिका-यांकडे चार जणांनी वैयक्तिक लाभासाठी बनावट अपंग प्रमाणपत्र सादर केल्याची, तसेच वर्ष-वर्ष पाठपुरावा करूनही ख-या दिव्यांगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाने नाकारल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी कायदेशीर सल्ला घेऊन बनावट अपंग प्रमाणपत्र मिळविणा-यांविरोधात गुन्हा दाखल करू, असे सांगितले. मात्र, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. जुन्या कायद्यानुसार अपंगत्वाच्या सात प्रकारांनुसार प्रमाणपत्र देण्यात येते. यात सर्वाधिक अपघातांमुळे आलेल्या अपंगत्वाचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयाने १ एप्रिल २०१७ ते ३० जून २०१८ या कालावधीत एकूण ५ हजार ४४१ अपंगत्वाची प्रमाणपत्रे वाटली आहेत. अपघातांमुळे अपंगत्वाचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे.अपंग व्यक्ती अधिकार कायदा- २०१६ च्या कायद्यामध्ये २१ प्रकारच्या अपंगत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे. सध्या सरकारच्या एस.एडी.एम.या संगणकीय प्रणालीद्वारे दिव्यांगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, या प्रणालीत नवीन अपंगत्वांच्या प्रकारांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे २०१६ च्या कायद्यानुसार जर कोणी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला तर तो बाद ठरविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक दिव्यांगांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.अपंगत्वाचे प्रकार व प्रमाणपत्रांची संख्याअंध दिव्यांग - १०६४नाक, कान, घसा दिव्यांग - ६७९अस्थिव्यंग दिव्यांग - २६७८मनोविकृती दिव्यांग - १०२०बनावट अपंग प्रमाणपत्र वाटून जिल्हा रुग्णालयाकडून मूळ अपंगांवर अन्याय केला जात आहे. एकाच वर्षात ५ हजार ४४१ प्रमाणपत्र वाटणे म्हणजे संशयास्पद असून, या सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी व्हावी.-अॅड. लक्ष्मण पोकळे, जिल्हाध्यक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन