अहमदनगर: महापालिकेच्या आरोग्य पथकाने सोमवारी अडीच हजार घरांचा सर्व्हे केला. आजअखेर ५४ हजार ८१७ घरांचा सर्व्हे पूर्ण झाला असून रुग्णांची संख्या १ हजार ७९ वर पोहचली आहे. सोमवारी शहरात फक्त ५ नवीन रुग्ण आढळले. गत महिन्यापासून नगर शहरात कावीळ रोगाची साथ पसरली. दूषित पाण्यामुळे कावीळ झाल्याचा निष्कर्ष समोर आल्यानंतर महापालिकेने शुध्द पाणी पुरवठा करण्याची खबरदारी घेतली. त्याला आता कुठेतरी यश येत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या आरोग्य पथकाने शहरातील घरोघरी जावून काविळीचा सर्व्हे करण्यास प्रारंभ केला. आतापर्यंत पथकाने ५४ हजार ८१७ घरांचा सर्व्हे पूर्ण केला. सर्व्हेत १ हजार ७९ जणांना काविळीची लागण झाल्याचे समोर आले. त्यातील जवळपास ४०० रुग्णांना रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले आहे. अन्य रुग्णांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सोमवारी आरोग्य पथकाने २ हजार ५८१ घरांचा सर्व्हे केला. त्यात २० काविळीचे रुग्ण आढळून आले. १५ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले तर पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. गत आठवडाभरातील रुग्णांची संख्या पाहता सोमवारी केवळ पाच रुग्ण आढळून आल्याने आता काविळीची साथ आटोक्यात येत असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. (प्रतिनिधी)
५४ हजार घरांचा सर्व्हे
By admin | Published: September 16, 2014 11:45 PM