चंद्रकांत शेळके, अहमदनगर: पोटाचे आजार वाढीचे सर्वांत मोठे कारण दूषित पाणी असते. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात ४६ गावांतील ५४ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात या गावांची चिंता वाढली आहे. यात सर्वाधिक १३ दूषित नमुने श्रीगोंदा तालुक्यातील आहेत.
जलजीवन मिशनअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळाने स्वच्छ पाणी देण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाने केला आहे. त्यादृष्टीने कामेही सुरू आहेत. परंतु, जिल्ह्यातील ४६ गावांतील पाणी नमुने दूषित आढळल्याने त्या गावांत उपाययोजना कराव्या लागणार आहेत. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात सर्व गावांतून १५३६ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यातील ५४ गावांतील पिण्याच्या पाण्याचा अहवाल दूषित आला आहे.
गावपातळीवर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, स्रोत या ठिकाणचे पाणी नमुने जलसंरक्षकांमार्फत घेऊन त्याची वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी यांच्या कार्यालयात असणाऱ्या प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येते. या ठिकाणी तपासणी केल्यानंतर दूषित पाणी आढळणाऱ्या गावांना याबाबत कळवण्यात येऊन दूषित पाणी शुद्धीकरणासाठी प्रक्रिया राबवण्यात येते.
दूषित पाण्यामुळे होतात हे आजार
दूषित पाण्यापासून पाच ते सहा प्रकारचे आजार होतात. त्यात गॅस्ट्रो हा पहिला आजार. गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासांत ही लक्षणे दिसतात. पावसाळ्यात ही लक्षणे साथीच्या आजारासारखी पसरतात. उलटी, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. याशिवाय कावीळ, टायफाॅइड असे आजारही होतात.
या गावांतील पाणी दूषित
- अकोले - ढोकरी, कुंभेफळ, धुमाळवाडी, आबितखिंड, ताठेवाडी, पालसुंदे.
- कोपरगाव - धारणगाव, संवत्सर.
- नगर - आंबिलवाडी, पिंपरीघुमट, वडगाव गुप्ता, विळद, हिवरेबाजार, जखणगाव, हिंगणगाव, हमीदपूर, मांडवे, माळीचिंचोरे, कारेगाव.
- नेवासा - माळीचिंचोरे, कारेगाव.
- पारनेर- भाळवणी, वडगाव आमली, पाडळी आळे, डोंगरवाडी, टाकळी ढोकेश्वर.
- पाथर्डी - निपाणी जळगाव, पत्र्याचा तांडा.
- राहाता - अस्तगाव.
- राहुरी - कानडगाव, तुळापूर.
- संगमनेर - नान्नजदुमाला, वडगाव पान, अकलापूर, माळेगाव हवेली.
- शेवगाव - एरंडगाव भागवत.
- श्रीगोंदा - म्हसे, वडगाव, रायगव्हाण, राजापूर, विसापूर, देवदैठण, चांभूर्डी, उखलगाव, हिंगणवाडी, गव्हाणेवाडी, वळदगाव, मालुंजे बु.