अहमदनगर : नगर, राहुरी, पाथर्डी व पारनेर तालुक्यातील शेतक-यांना राज्य सरकारने सुमारे ५६ कोटी ३४ लाखांचा दुष्काळ निवारण निधी मंजूर केला असून हा मदतनिधी लवकरच शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली आहे.गतवर्षी अत्यल्प पावसामुळे शेतक-यांना खरीप हंगामात पिके हाती लागली नव्हती. त्यामुळे शेतक-यांवर मोठे संकट ओढवलेले आहे. या भीषण दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतक-यांना दुष्काळ निवारण निधी मंजूर केला आहे. नगर जिल्ह्यातील कायम दुष्काळी असलेल्या नगर तालुक्याला ९ कोटी ९८ लाख ५१ हजार, पारनेर तालुक्याला १२ कोटी ७ लाख ५९ हजार, पाथर्डी तालुक्यासाठी १७ कोटी ७१ लाख ६६ हजार आणि राहुरी तालुक्याला १६ कोटी ५६ लाख ८० हजार एवढा दुष्काळ निवारण निधी मंजूर झाला असल्याचे आमदार कर्डिले यांनी सांगितले.