रुईछत्तीसी : नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सोमवारी रॅपिड अँटिजन किटद्वारे १५० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातील ५९ जण कोरोनाबाधित आढळून आले.
रुईछत्तीसी, हातवळण, मठपिंप्री, वाटेफळ, गुणवडी, अंबिलवाडी या गावांत कोरोना रुग्ण वाढले आहेत. स्थानिक डॉक्टरांकडेही रुग्णांची संख्या वाढली होती. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियोजनाने आणि पंचायत समिती सदस्य रवींद्र भापकर यांच्या पाठपुराव्याने कोरोना अँटिजन चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळणाऱ्या १५० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात ५९ जण बाधित आढळले. या सर्व गावांचे प्रमुख केंद्र असल्याने या गावात शिबिराचे आयोजन करणे गरजेचे होते, असे प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. सविता ससाणे यांनी सांगितले. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करत दक्ष राहावे, असे आवाहन ससाणे यांनी केले.
यावेळी सरपंच विलास लोखंडे, सोमनाथ गोरे, प्रवीण गोरे, श्रीकांत जगदाळे, संदीप गोरे आदींनी परिश्रम घेतले.
--
गावनिहाय कोरोनाबाधित :
रुईछत्तीसी २१, साकत १३, दहिगाव ३, वडगाव १, मठपिंप्री ४, तांदळी २, वाळुंज १, अंबिलवाडी २, हातवळण १, शिराढोण २.
--
कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्यांची तपासणी करण्यात आली. बाधित आढळलेल्या रुग्णांनी विलगीकरणात राहून स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्यावी.
-रवींद्र भापकर,
पंचायत समिती सदस्य, नगर