पारनेर : पावसाळा संपत आला तरी पारनेर तालुक्यातील ढोकी, तिखोल सह अनेक तलाव कोरडे आहेत तर काही तलावांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. तालुक्याला वरदान ठरणाऱ्या मांडओहोळ धरणात फक्त पन्नास टक्केच पाणीसाठा असल्याने पाण्याची चिंता वाढली आहे. प्रशासनाने तालुक्यातील सुमारे साठ गावे व दोनशे वाड्यांचे टँकर सरसकट बंद केल्याने अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे.सप्टेंबरचा दुसरा आठवडा संपत आला तरी अद्याप पारनेर तालुक्यात कमीच पाऊस आहे. यामुळे तालुक्यातील उत्तर भागाला वरदान ठरणाऱ्या मांडओहोळ धरणात फक्त पन्नास टक्केच पाण्याची आवक झाली आहे. दुष्काळात तालुक्याला पाणीपुरवठा करणारे हे धरण आॅगस्टअखेर भरत असते, मात्र अजुनही धरणात पूर्ण पाणीसाठा झाला नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.या धरणातील पाण्यावर टाकळी ढोकेश्वरसह परिसरातील गावांमधील नळपाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. तर शेजारील गावांच्या शेतीलाही पाणी मिळते ते यावेळी अपुरे असल्याने शेतीला पाणी कमी मिळणार असल्याने शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. तसेच नगर-कल्याण महामार्गावर असलेले ढोकी एक व ढोकी दोन तलाव कोरडे आहेत. तर तिखोल तलावात थोडाच पाणीसाठा आहे.पारनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हंगा तलावातही अत्यल्प पाणीसाठा आहे. त्याचा परिणाम पारनेर शहराच्या नळपाणीपुरवठा योजनेवर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शहराला सुपा येथील एमआयडीसीतून पाणी विकत घेण्याची वेळ भविष्यात येऊ शकते. शहरात सध्या तीन दिवसांनी पाणी देण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केलेले असले तरी चांगला पाऊस झाला नाही तर पारनेर शहराचा पाणीप्रश्नही बिकट होणार आहे. शहराच्या नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातही अत्यल्प पाणीसाठा आहे तर काही कोरडे आहेत.