अहमदनगर : कर्जत तालुक्यातील शिंदे येथील दलित वस्तीवर हल्ला व मारहाण खटल्यातील ६१ आरोंपीची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्त ता केली. शिंदे येथे ४ मार्च २००४ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी सिंदुबाई दत्तात्रय शिंदे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.या खटल्याची जिल्हा न्यायालयात २०१३ पासून सुनावणी सुरू झाली. हा खटला लढविण्यासाठी सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून औरंगाबाद येथील अॅड. संघमित्रा वाघमारे यांची नियुक्त केली होती. २००४ मध्ये शिंदे येथील दलित समाजातील व्यथांबाबत एका वृत्तपत्राने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर दलित चळवळीतील नेत्यांनी शिंदे या गावात भेटी दिल्या होत्या. ४ मार्च रोजी मिराबाई आंबेडकर यांनी शिंदे येथे दलित वस्तीत भेट देऊन या समाजातील नागरिकांशी चर्चा केली. दुपारनंतर आंबेडकर गावातून निघून गेल्यानंतर गावातील काही लोकांनी संघटितपणे येऊन दलित समाजातील नागरिकांच्या घरांवर हल्ला करत तोडफोड करत मारहाण केली होती. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात शिंदे येथील ६८ जणांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली होती. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम, कलम ३०७,३२६,३२४,१४७ आदी कलमाप्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झालेल्या ६८ पैैकी तीन जण फरार, एक मयत तर तीन नावाचे माणसेच अस्तित्वात नसल्याचे समोर आले. त्यामुळे ६१ जणांविरोधात हा खटला चालला़ खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने एकूण २२ साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्र पांडे यांनी हा निकाल दिला. आरोपींच्यावतीने अॅड. सुभाष काकडे यांनी हा खटला लढविला. त्यांना अॅड. सौरभ काकडे व अॅड. रोहित सिद्ध यांनी सहकार्य केले.
चौदा वर्षानंतर निकाल
शिंदे येथे २००४ रोजी दलित वस्तीवर हल्ला झाल्याची घटना घडली़ होती. या खटल्याचा तब्बल १४ वर्षानंतर निकाल लागला. सक्षम पुराव्याअभावी यातील सर्व आरोपी निर्दोष सुटले़ निकालाच्या दिवशी या खटल्यातील विशेष सरकारी वकील संघमित्रा वाघमारे या उपस्थित नव्हत्या.