अहमदनगर : बुधवारपासून जिल्ह्यात सुरू होणा-या बारावी परीक्षेसासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत ९३ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, जिल्ह्यातील ६४ हजार ३४६ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या नियंत्रणाखाली सुरुवातीला बारावी आणि त्यानंतर दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षेला बुधवारी दुपारी ११ वाजता प्रारंभ होणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने ९३ परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली आहे़ परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा जिल्हास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी दोन पोलीस कर्मचा-यांचीही नेमणूक करण्यात येणार आहे. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींची केंद्रावरील परिस्थितीवर नजर राहणार आहे. बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात २१ परिरक्षक केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. या केंद्रातून प्रश्नपत्रिकांचे वाटप होणार आहे. यापूर्वी बंदी पेटीतून प्रश्नपत्रिका परिरक्षक केंद्रावर पोहोचत केल्या जात असे. तेथून त्या केंद्रांवर पोहोचत करण्यात येत होत्या. परंतु, चालूवर्षी २५ प्रश्नपत्रिकांचे बंद पाकीट मिळणार आहे. ते वर्गात विद्यार्थ्यांसमोर उघडले जाणार आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटीला आळा बसेल, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.
केंद्र परिसरात मोबाईल बंदी
जिल्ह्यातील ९३ केंद्रांवर बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत़ या केंद्रांवर विद्यार्थ्यांसह उपकेंद्र संचालक, पर्यवेक्षक उपपर्यवेक्षक आदी कर्मचा-यांचे मोबाईलही जमा केरून घेतले जाणार आहेत. केंद्र संचालक वगळता इतरांचे मोबाईल जमा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सहा भरारी पथके
क्षेत्रफळाने जिल्हा मोठा असल्याने दहावी व बारावीच्या परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा भरारी पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि निरंतर शिक्षणाधिका-यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी एक पथक स्थापन करण्यात आले आहे. महापालिका, उपशिक्षण अधिकारी आणि शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येकी एक पथक स्थापन करण्यात आले आहे.
साडेदहानंतर केंद्रांवर बंदी
बारावी परीक्षा केंद्रांवर दुपारी १०़३० वाजेनंतर बंद घालण्यात आली आहे. परीक्षा ११ वाजता सुरू होणार असली तरी साडेदहा वाजताच केंद्रांवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यानंतर येणा-या विद्यार्थ्यांना केंद्र संचालकांची परवानगी घ्यावी लागेल.