अहमदनगर : यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने टंचाई कृती आराखडा तयार करून त्याला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेतली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात मार्चनंतर ३२१ गावे आणि १ हजार ३९ वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई जाणवू शकते. यासाठी ७ कोटी ३७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यात टँकरसाठी साडेसहा कोटी तर विहिरी अधिग्रहणासाठी ८१ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
दरवर्षी ऑक्टोबर ते जून या कालावधीत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. त्यानुसार यंदा ७ कोटी ३७ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्यात बुडक्या खोदणे, विहीर खोल करणे, गाळ काढणे, खासगी विहीर अधिग्रहण करणे, पाण्याचे टँकर भरण्यासाठी उद्भव निश्चित करून ठेवणे, टँकर अथवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, प्रगतिपथावरील योजना तातडीने पूर्ण करणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, नवीन विंधन विहिरी घेणे, तात्पुरत्या नळ योजना घेणे आदी उपाययोजनांचा समावेश असतो. परंतु सद्य:स्थितीत केवळ विहिरी अधिग्रहित करणे, टँकर भरणे व पुरवठा करणे, नळ योजना विशेष दुरुस्ती या चार उपाययोजनांवरच तरतूद केलेली आहे. ७.३७ कोटींचा आराखडा मंजूरयंदा जिल्हा परिषदेने ७ कोटी ३७ लाख ५२ हजार खर्चाचा टंचाई आराखडा तयार केला आहे. यात खासगी विहिरी अधिग्रहण करण्यासाठी ८१ लाख ४५ हजार, टँकर भरण्यासाठी २१ लाख २३ हजार, टँकरद्वारे, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ६ कोटी ३२ लाख, नळ योजना विशेष दुरुस्तीसाठी २ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. ३२१ गावांची तहान भागणारजिल्ह्यातील प्रस्तावित ३२१ गावे व १,०३९ वाडी-वस्तींचा टंचाई आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. यात सर्वाधिक १ कोटी ५५ लाखांची तरतूद संगमनेर तालुक्यात, त्यानंतर १ कोटी १७ लाख नगर तालुका, ९७ लाख जामखेड, ७७ लाख कर्जत, तर ५९ लाखांची तरतूद अकोले तालुक्यासाठी करण्यात आली आहे.