अहमदनगर : नगर शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट कामांबाबत काँग्रेसने बुधवारी मध्यरात्री अनोखे आंदोलन केले. कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या बाजारपेठेतील शनी चौक ते होशिंग हॉस्पिटल दरम्यान मनपाने प्रभाग क्रमांक १२ मध्ये केलेला सिमेंटचा रस्ता अवघ्या चार-पाच महिन्यांमध्ये खराब झाला. या रस्त्यावर 'भ्रष्टाचाऱ्यांना ७० टक्के, रस्त्याला ३० टक्के' असे लिहीत काँग्रेसने नगरकरंच्यावतीने मनपा, ठेकेदार, लोकप्रतिनिधी यांचा निषेध केला.
यावेळी आंदोलनात ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक संजय झिंजे, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजिनीयर सुजित क्षेत्रे अडी सहभागी झाले होते. रस्त्याच्या कामांत ७० टक्के टक्के कमिशन खाणे सुरू आहे. केवळ ३० टक्केच रक्कम प्रत्यक्षात रस्त्यावर खर्च केली जाते. मग हे रस्ते कसे दर्जेदार तयार होतील, असा सवाल काळे यांनी यावेळी केला. हा वर्दळीचा रस्ता आहे. भिंगारवाला चौक ते कोतवाली पोलीस स्टेशन ते जुन्या मनपाच्या चौकापर्यंत रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. हा रस्ता व्हावा, अशी व्यापारी, नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी मनपाने लोकप्रतिनिधींच्या आग्रहातून सिमेंट काँक्रीटीकरण करत शनि चौक ते होशिंग हॉस्पिटल दरम्यानचा रस्ता पूर्ण केला होता. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा औट घटकेचा ठरला असून रस्ता गायब झाला आहे. येत्या पावसाळ्यात उरलेला रस्ता देखील पूर्ण वाहून जाईल. नगरकरांच्या तोंडाला भ्रष्टाचारांकडून पाने पुसली जात असल्याचा अरोप काळे यांनी केला. ते म्हणाले की, मनपात ७० टक्के कमिशन राज सुरु आहे. शहरातील रस्त्यांची ऑनफिल्ड तपासणी करण्याचे काम काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत. चार-पाच महिन्यांपूर्वी झालेल्या रस्ता गायब होणे हे म्हणजे जनतेचा भ्रष्टाचाऱ्यांवर दबाव नसल्यामुळे आणि ज्या लोकप्रतिनिधींवर यांना जाब विचारण्याची जबाबदारी आहे तेच मलिदा खाण्यामध्ये गुंतलेले असल्यामुळे लूट सुरू आहे. सत्तेत असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे सभागृहात नागरिकांच्या वतीने भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवायला कुणी तयार नाही. मात्र संगनमताने सुरू असणाऱ्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरत आहे.