अहमदनगर : वृद्ध साहित्यिक व कलावंतांना राज्य शासनाकडून देण्यात येणारे मानधन गेल्या तीन महिन्यांपासून थकले असल्याने नगर जिल्ह्यातील १०५१ कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कलावंतांसाठीचा नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी अशा तीन महिन्यांचा एकूण ७१ लाखांचा निधी येणे बाकी आहे.
साहित्य, नाट्य व कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वृद्ध कलावंतांची निवड करून त्यांना दरमहा मानधन दिले जाते. राष्ट्रीय कलावंतांना ‘अ’ दर्जा, राज्यस्तरीय कलावंतांना ‘ब’ दर्जा आणि स्थानिक कलावंतांना ‘क’ दर्जा अशी कलावंतांची विभागणी केली जाते. ‘अ’ दर्जाच्या कलावंतांना ३७ हजार ८०० रुपये (दरमहा ३१५० रुपये), ‘ब’ दर्जाच्या कलावंतांना ३२ हजार ४०० (दरमहा २७००), तर ‘क’ दर्जाच्या कलावंतांना दर वर्षाला २७ हजार रुपये (दरमहा २२५०) मानधन देण्यात येेते.
जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या कलाकार निवड समितीमार्फत दर वर्षी कलाकारांची निवड होते. ज्या कलाकारांना वयोमानामुळे कला सादर करता येत नाही, त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो, अशा कलावंतांना या योजनेचा आधार मिळतो.
नगर जिल्ह्यात ‘अ’ दर्जाचे ६, ‘ब’ दर्जाचे ४, तर ‘क’ दर्जाचे १०४१ असे एकूण १०५१ लाभार्थी आहेत. त्या सर्वांचे नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी अशा तीन महिन्यांचे ७१ लाख १५ हजार ८५० रुपयांचे मानधन थकले आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात मानधन मिळण्याबाबत कलावंत विचारणा करतात; परंतु मानधन थेट मुंबईतील सांस्कृतिक कार्य विभागातून लाभार्थ्यांच्या खात्यावर पडत असल्याने जिल्हा परिषदेकडे याची फारशी माहिती नाही.
---------
आठ दिवसांत मानधन मिळणार!
मानधन रखडल्याबाबत संबंधित विभागात विचारणा केली असता, नोव्हेंबर व डिसेंबरचे मानधन येत्या आठ दिवसांत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती मिळाली.
-----------
सदर योजनेत थेट शासनाकडून मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग होते. नोव्हेंबरपर्यंतचे मानधन वर्ग झालेले आहे. उर्वरित मानधन मिळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे.
- देवीदास कोकाटे, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
-----------
नगर जिल्ह्यात
मानधन दिले जाणारे राष्ट्रीय कलावंत- ६
मानधन दिले जाणारे राज्यस्तरीय कलावंत - ४
मानधन दिले जाणारे जिल्हास्तरीय कलावंत - १०४१
-----------
दिले जाणारे मानधन
राष्ट्रीय कलावंत - दरमहा ३१५० रुपये राज्यस्तरीय कलावंत - दरमहा २७०० रुपये
जिल्हास्तरीय कलावंत - दरमहा २२५० रुपये