अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या रोजगार हमी कार्यक्रमातून वर्षभरात ८७ हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. जिल्ह्यात दुष्काळस्थिती असताना रोहयोवरील मजुरांच्या संख्येत अपेक्षित वाढ झालेली दिसली नाही. वर्षभरात रोहयो प्रशासनाने ७१ कोटी ७९ लाख रुपयांचे नियोजन केले होते. त्यापैकी केवळ १२ कोटी १२ लाख रुपयांचा खर्च विकास कामावर करणे प्रशासनाला शक्य झाले.अलीकडच्या काही वर्षात रोहयोचे बदलेले नियम आणि अल्प मजुरीमुळे रोहयोवर काम करण्याकडे मजुरांचा कल कमी असल्याचे दिसून येत आहे. रोहयोच्या कामासाठी जॉब कार्डवर नोंदणी करणे, त्यानंतर कामाचे मस्टर तयार करणे, पगारासाठी बँक अथवा पोस्टात खाते उघडणे आदी किचकट नियमामुळे मजुरांची बहुतांशी वेळा रोहयोकडे पाठ असल्याचे चित्र आहे. यासह आता बँक खात्यासाठी आधार कार्ड लिंकिंग करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत ६ लाखाहून अधिक मजूर आहेत. कार्यरत असणारे फक्त १ लाख ४१ हजार मजूर आहेत. रोहयोत २ हजार ७२८ अपूर्ण राहिलेली कामे शंभर टक्के पूर्ण करण्यात आलेले आहेत. मात्र विहिरीची १ हजार ६४७ कामे अपूर्ण राहिलेली आहेत. अपूर्ण असणारी ही कामे पूर्ण करण्यासाठी सरकार पातळीवरून मोठा पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या २५४ ग्रामपंचायतीमध्ये ५६७ कामे सुरू असून या ठिकाणी ७ हजार ७७८ मजुरांची उपस्थिती आहे. महसूल विभागाच्या यंत्रणेमार्फत साधारण १० हजारांच्या जवळपास मजूर रोहयोवर कार्यरत आहेत. रोहयोतून वैयक्तिक विहिरीची कामे, गाळ काढणे, शोषखड्डे, इंदिरा आवास घरकूल, रस्ते, कंपार्टमेंट बंडिंग, शेततळे, विहीर पुनर्भरण, विखुरलेली वृक्ष लागवड, फळबाग लागवड, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, जनावरांचा गोठा लागवड यांची कामे सुरू आहेत. (प्रतिनिधी)
७१ पैंकी १२ कोटीच खर्च
By admin | Published: June 26, 2016 12:31 AM