अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नगर शहरातील ख्रिस्त गल्ली व मार्केट यार्ड ,अशा दोन ठिकाणी छापे टाकत ७२ लाखांची रोकड जप्त केली आहे. ही रक्कम हवाल्याची असून, ताब्यात घेतलेले दोघेही गुजरात राज्यातील असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.
एवढ्या मोठ्या प्रमाणात या दोघांनीही रक्कम कशासाठी आणली. याबाबत रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. या संदर्भात जिल्हाधिकारी आयकर विभाग आणि पोलीस यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीला या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. आयकर विभागाकडून पुढील चौकशी करण्यात येईल. या रकमेबाबत संबंधितांकडून माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे.
लोकसभा निवडणूकची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ची नगर जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असून ,जिल्ह्यातील सर्व मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. या नाकाबंदीदरम्यान काही प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जात आहे.