तीसगाव : मिरी (ता. पाथर्डी) येथील एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या जगण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीला डॉक्टर, आरोग्य सेवक यांच्यासह कुटुंबाचीही साथ मिळाली. त्यामुळे त्यांनी रेमडेसिविरविना कोरोनावर मात केली.
नागुजी तात्याबा मोटे असे कोरोनावर मात केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंबांवर वडीलधारी, तरुण मुले गमाविण्याची वेळ आली. अनेक कोरोबाधित व्यक्ती धास्तीने बळी पडत आहेत. अशा वातावरणातही वय ७५, एचआरसीटी स्कोअर १४ आणि ऑक्सिजनची लेवल ८० च्या खाली असतानादेखील प्रबळ इच्छाशक्ती आणि खंबीर मनाच्या जोरावर नागुजी मोटे यांनी कोरोनावर यशस्वी मात करत इतर रुग्णांनाही या आजारावर मात करण्याचे बळ दिले.
मिरी येथील दत्तप्रसाद कोविड हेल्थ सेंटरचे डॉ. नंदकिशोर नरसाळे, डॉ. अविनाश नरवडे, डॉ. नितीन समुद्रे आणि माजी सरपंच संतोष शिंदे म्हणाले, ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मिरीसारख्या ठिकाणी आम्ही डॉक्टर व काही राजकीय मंडळींनी एकत्रित येऊन ऑक्सिजन बेडसह दत्त प्रसाद कोविड हेल्थ सेंटर सुरू केले.
शहरातील मोठ्या रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर तो दडपणाखाली राहतो. अनेक रुग्ण भीतीपोटी मृत्युमुखी पडतात. हे ओळखून आम्ही सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये सर्व रुग्णांसाठी खेळीमेळीचे वातावरण ठेवले. त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा मानसिक ताणतणाव येऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. ते त्यांच्या घरीच कुटुंबीयांसोबत आहेत, असे समजून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
---
सहा रुग्ण कोरोनामुक्त
आमच्याकडे ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असतानादेखील आतापर्यंत कोणत्याही रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची गरज भासली नाही. बारा रुग्णांपैकी सहा रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नागोजी पोटे यांच्यावरही अशाच पद्धतीने उपचार केल्याने तेही ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनविना कोरोनामुक्त झाले, असे डॉ. नरसाळे, डॉ. नरवडे यांनी सांगितले.
---
०७ मिरी
मिरी येथील कोविड सेंटरमध्ये कोरोनामुक्त झालेले ज्येष्ठ नागरिक. यावेळी डाॅक्टर व येथील आरोग्य सेवक.