अहमदनगर : कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तरी स्कोअर पाहून उपचाराची दिशा ठरत असल्याने शहरासह ग्रामीण भागात सिटी स्कॅनचा सध्या धडाका सुरू आहे. त्यामुळे दररोज सुमारे २ हजार ५०० सिटी स्कॅन होत असून, महिन्याला ७५ हजार सिटी स्कॅन केले जात आहे. सरसकट अडीच हजार रुपयांचा दर आकारला जात असल्याने शासकीय दर नावालाच आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवर यामुळे ताण आला आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात जातात. सर्वप्रथम त्यांना सिटी स्कॅन करण्यास सांगितले जाते. रुग्णाचा एचआरसीटी स्कोअर किती आहे, यावरून पुढील उपचाराची दिशा ठरविली जाते. सिटी स्कॅन करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने शासनाने सिटी स्कॅनचे दर निश्चित केले आहेत. परंतु, सध्या सर्वत्र सरसकट २ हजार ५०० रुपये रुग्णांकडून आकारले जात आहेत. ग्रामीण भागात तर स्कॅनसाठी रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत. ग्रामीण भागात सिटी स्कॅन मशीनची संख्या कमी असल्याने सरसकट अडीच हजार रुपये दर आकारले जात आहेत. कोरोनाचे झटपट निदान होत असल्याने रुग्णही अडीच हजार रुपये देतात. सिटी स्कॅनचा रिपोर्ट घेऊन रुग्ण डॉक्टरांकडे जातात. स्कोअरचा अहवाल मिळाल्याने डॉक्टरांना तातडीने उपचार सुरू करणे शक्य होत असून, डॉक्टर ही आधी सिस्टी स्कॅन करून या मग, पाहू, असे सांगतात.
सिटी स्कॅनमुळे झटपट निदान होते. कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन बरे झाल्यानंतरही शंका म्हणून पुन्हा सिटी स्कॅन करून घेतात. स्कोअर शून्य आल्याची खात्री झाल्यानंतरच रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे, असा निष्कर्ष काढला जातो. त्यामुळे कोरोनाचे झपटपट निदान करणारे मशीन म्हणून सध्या सिटी स्कॅनकडे पाहिले जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
.....
शासनाने निश्चित केलेले दर
१६ स्लाईसखालील सिटी स्कॅन- २०००
१६ ते ६४ स्लाईस सिटी स्कॅन- २५००
६४ पेक्षा अधिक स्लाईस सिटी स्कॅन- ३०००
.....
सिटी स्कॅनचे प्रमाण दुपटीने वाढले
सिटी स्कॅनमुळे कोरोनाचे झटपट निदान होत असल्याने सध्या सर्रास सिटी स्कॅन केले जात आहे. यामुळे रुग्ण गंभीर आहे की नॉर्मल हे समजते. त्यामुळे डॉक्टरही सिटी स्कॅन करण्यास सांगत असल्याने सिटी स्कॅनचे प्रमाण दुप्पट झाले आहे.
.....
सिटी स्कॅनच्या स्कोअरवरून ठरतात रुग्णांचे प्रकार
१ते ९ स्कोअर- सौम्य
९ ते १५ स्कोअर- मध्यम
१६ ते २५ स्कोअर - गंभीर
० स्कोअर- नॉर्मल
.....
- कोरोनामुळे सिटी स्कॅन मशीनचे दर वाढले आहेत. रुग्णांची संख्याही वाढलेली आहे. असे असताना सरकारने सिटी स्कॅनचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसारच दर आकारले जात असून, दररोज साधारण २५०० सिटी स्कॅन होत आहेत. यामुळे कोरोनाचे झटपट निदान होत आहे.
- सुशील नेमाने, अध्यक्ष, रेडीओलॉजिस्ट असोसिएशन
...
शहरात ११ सिटी स्कॅन मशीन
नगर शहरात ११ ठिकाणी सिटी स्कॅन मशीन्स आहेत. सिटी स्कॅन करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे गर्दी वाढली असून, दिवसभरात्र हे काम सुरू आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला तरी स्कोअर किती आहे. यावरच उपचाराची दिशा ठरविली जात असल्याने ही चाचणी महत्वाची आहे.