अहमदनगर : इयत्ता दहावीच्या परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील ७६ हजार २१९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शिक्षण विभागाने जिल्ह्यात एकूण १७१ परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था केली असून, केंद्र परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील १७१ केंद्रांवर गुरुवारी सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरुवात होणार आहे. गेल्या २१ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू आहे. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात सहा भरारी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. या पथकांवर आता दहावीच्या परीक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यात तीन परीक्षा केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. दहावीच्या इंग्रजी व मराठीच्या पेपरचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.बारावीच्या प्रश्नपत्रिका थेट विद्यार्थ्यांसमोर वर्गात उघडल्या जातात. दहावीच्या प्रश्नपत्रिका मात्र पूर्वीप्रमाणेच येणार आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तालुक्याला प्रश्नपत्रिका पुरविल्या जाणार आहे. तालुका मुख्यालयातून प्रश्नपत्रिका केंद्रांवर पोहोच केल्या जाणार आहेत. प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होऊ नये, यासाठी केंद्रप्रमुख वगळता सर्व कर्मचा-यांचे मोबाईल जमा करून घेण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अर्धा तास उशीर झाल्यास परीक्षेला मुकावे लागणार
परीक्षेला सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे. त्यानंतर दहा मिनिटे उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येईल. परंतु, त्यापेक्षा जास्त उशीर झाल्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असे निर्देश शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेआधी परीक्षा केंद्रांवर पोहोचणे आवश्यक आहे.
तालुकानिहाय परीक्षा केंद्र
नगर शहर- १६, नगर ग्रामीण-११, अकोले-१४, जामखेड-५, कर्जत-१२, कोपरगाव-१०, नेवासा-१३, पारनेर-१३, पाथर्डी-१२, राहुरी-८, संगमनेर-१७, शेवगाव-७, श्रीगोंदा-१३, श्रीरामपूर-९, राहाता-११.
बारावीच्या १६ कॉपी बहाद्दरांवर कारवाई
शिक्षण विभागाच्या पथकाने बुधवारी बारावीच्या परीक्षेला कॉपी केल्याने जामखेड तालुक्यातील ३ तर नगर तालुक्यातील एकावर कारवाई केली. त्यामुळे बारावी परीक्षेतील कॉपी बहाद्दरांची संख्या १६ झाली आहे.